साडेसहा हजार मेट्रिक टन धान्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:06+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने मजूर, शेतमजूर, शेतकरी, अंत्योदय आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नधान्याची गरज लक्षात घेवून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत तीन महिन्यांपर्यंत गरिबांना ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत मिळणार आहे. यासह एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे धान्य प्रत्येक महिन्याला शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ तीन महिने मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासोबतच शिधापत्रिकाधारकांनाही वेळेत धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी वर्ध्यातील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात १ लाख १६ हजार ६५६ मेट्रिक टन धान्य साठा उपलब्ध झाला असून एप्रिल व मे महिन्याच्या वाटपासाठी जिल्हा प्रशासनाला ६,७२० मेट्रिक टन धान्यसाठा वितरित करण्यात आला आहे. तालुकानिहाय धान्यपुरवठा करण्यात आला असून स्वस्तधान्य दुकानांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन धान्य वाटप सुरु आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने मजूर, शेतमजूर, शेतकरी, अंत्योदय आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नधान्याची गरज लक्षात घेवून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत तीन महिन्यांपर्यंत गरिबांना ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत मिळणार आहे. यासह एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे धान्य प्रत्येक महिन्याला शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. तसेच अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकऱ्यांना ही २ रुपये किलोप्रमाणे गहू व ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ मिळणार असल्याने लाभार्थ्यांना मोठा आधार होणार आहे. तीन महिन्याची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या लाभार्थ्यांचा विचार करुन आतापर्यंत १ लाख १६ हजार ६५६ मेट्रिक टन धान्यसाठा भारतीय खाद्य निगमकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये ९७ हजार ५१७ मेट्रिक टन गहू व १९ हजार १३९ मॅट्रिक टन तांदूळ उपलब्ध आहे. एप्रिल व मे महिन्यासाठी आवश्यकतेनुसार ६ हजार ७३० मेट्रिक टन धान्य भारतीय खाद्य निगमकडून जिल्हा अन्नपुरवठा विभागाला देण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये अन्नधान्य पुरवठ्याचे काम सुरु असून लागलीच भारतीय खाद्य निगमकडून जून महिन्याचाही धान्यपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात मुबलक धान्यसाठा असून सर्वापर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.
असा होत आहे लाभार्थ्यांना धान्यपुरवठा
अंत्योदय अन्न योजना (पिवळी शिधापत्रिका) च्या लाभार्थ्यांना २ रुपये प्रतिकिलो प्रमाणे १५ किलो गहू, ३ रुपये किलो प्रमाणे २० किलो तांदूळ तसेच मोफत ५ किलो प्रति व्यक्ती प्रमाणे धान्य दिल्या जात आहे. प्राधान्य कुंटुंब लाभार्थी (पिवळी व केसरी शिधापत्रिका) लाभार्थ्यांना २ रुपये प्रति व्यक्ती ३ किलो गहू, ३ रुपये किलो प्रमाणे प्रती व्यक्ती २ किलो प्रमाणे तांदूळ तसेच मोफत ५ किलो प्रति व्यक्ती वाटप केल्या जात आहे. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी तहसील कार्यालयात नोंदणी केल्यानंतर एप्रिल, मे व जून महिन्यांचे धान्य उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच धान्याचे वाटप केले जात आहे. उपलब्ध झालेला धान्यसाठी प्रत्येक तालुक्याला पुरविण्यात आला असून सर्वत्र अन्नधान्य वाटपाचे काम प्रगतीपथावर आहे. यासंदर्भात स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल.
- रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.
धान्य वाटप करताना अमरावतीच्या दोघांविरुद्ध गुन्हा
कारंजा (घा.) : येथील विठ्ठल टेकडी परिसरात नागरिकांना विना परवानगीने अन्नधान्य वाटप करीत असलेल्या अमरावती येथील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल हफीज अब्दुल हकीम आणि रियाज खान दोन्ही रा. अमरावती हे एम. एच. ०२ डि. जे. ८९८९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने अन्नधान्य वाटप करीत असल्याची माहिती निगराणी पथकातील प्रभाकर नासरे यांना मिळाली. नासरे यांनी टेकडी परिसरात जात त्यांची विचारपूस केली असता त्यांनी परिसरात बारा जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप केल्याचे सांगितले. जिल्हाबंदी लागू असताना दोघेही वर्धा जिल्ह्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.