रुग्णालयातच होणार नवजात बालकांची आधार नोंदणी
By admin | Published: September 9, 2016 02:16 AM2016-09-09T02:16:50+5:302016-09-09T02:16:50+5:30
शासकीय व खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांची आधार नोंद करण्याचे आदेश शासनाने दिलेत.
निनावी नोंद : आधारलिंक करण्याच्या सूचना
पुरूषोत्तम नागपुरे आर्वी
शासकीय व खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांची आधार नोंद करण्याचे आदेश शासनाने दिलेत. सर्व संस्थांमध्ये जन्मलेल्या बालकांची त्या-त्या आरोग्य संस्थेच्या प्रमाणित आॅपरेटरद्वारे आधार लिंक करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या. या पार्श्वभूमीवर नवजात बालकांची रुग्णालयातच आधार नोंदणी होणार आहे.
नवजात बालकाचे नाव निश्चित न केलेल्या बालकांचीही आधार नोंदणी विना नावे करावी. अर्थात नवजात बालकाचे नाव निश्चित केले नसले तरी बेबी या नावाने त्याची आधार नोंदणी करण्याच्या सूचना आहे. नवजात बालकाचे नाव लगेचच निश्चित केले जात नाही. अशावेळी बालकाचे नाव बेबी, अशी नोंद करून आईचे नाव, ते बालक त्याच्या पालकाचे कितवे अपत्य आहे हे विचारात घेऊन त्या क्रमाकांचे मुल, अशी नोंद आधार यंत्रणेत केली जाणार आहे. यानंतर विना नावाची आधारमध्ये नोंदणी झालेल्या बालकाचे नाव आधारमध्ये ‘युडाई गव्हर्नमेंट डॉट इन’ या संकेतस्थळावर अद्यावत करता येईल. नोंदणी महानिबंधक कार्यालयातील नागरी नोंदणी यंत्रणा ही ‘चाईल्ड एनरॉलमेंट लाईट क्लाइंट’ या आधार नोंदणी यंत्रणेशी संलग्न केली जाईल.
पाच वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीमध्ये बोटांचे ठसे आणि बाहुलीची प्रतिमा ही बायोमॅट्रिक माहितीची नोंद घेतली जाणार नाही. याऐवजी त्यांचे आधार क्रमांक हे त्यांच्या पालकांच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. यात दिनांक आणि लिंग याची माहिती घेतली जाते. त्या अनुषगांने राज्यात नवीन आधार लिंक जन्म नोंदणी कार्यान्वित करण्यात आली आहे.