अवैध वाळू उपश्यामुळे सुरगावकरांच्या घशाला कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:00 AM2020-05-30T05:00:00+5:302020-05-30T05:00:28+5:30
दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर विहिरी बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एक दिवसाआड गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण, या वाळूचोरट्यांच्या उपद्रवामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ मोठे खड्डे पडल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संचारबंदी असो की मुक्ती, याचा वाळू चोरट्यांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. सेलू तालुक्यातील सूरगाव येथील सूर नदी व धामनदीमध्ये वारेमाप दिवसरात्र वाळूउपसा सुरू आहे. सुरगावला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील वाळू काढून नेल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी पाणी खोल गेल्याने दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. या अवैध उपस्यामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीलाही धोका असल्याने वेळीच आळा घालण्याची मागणी होत आहे.
सुरगाव येथील नदीपात्रामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून अवैधरीत्या वाळू उपसा सुरु आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही कठोर कारवाई न करता केवळ देखावा केला जात आहे. त्यामुळे गावामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील काही व्यक्तींसह सेलू, येळाकेळी, महाकाळ तसेच वर्ध्यातील नालवाडी, साटोडा, आलोडी आदी भागातील अनेक वाळूचोर सकाळपासूनच नदीपात्रात धुडगूस घालताना दिसतात.
दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर विहिरी बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एक दिवसाआड गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण, या वाळूचोरट्यांच्या उपद्रवामुळे पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ मोठे खड्डे पडल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
वाळू चोरट्यांमुळे नदीपात्राची चाळण झाली असून शासनाचाही मोठा महसूल बुडत आहे. सोबतच गावालाही भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.
शहरात मातीमिश्रित वाळूचा पुरवठा
सुरगाव हे सेलू तालुक्यात तर महाकाळ हे वर्धा तालुक्यात येत असून या दोन्ही तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाºयांंचे या ठिकाणावरील वाळू उपश्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणावरून येणारी मातीमिश्रित वाळू वर्धा शहरासह सेलूतील विविध शासकीय व खासगी बांधकामांकरिता वापरली जात आहे. नदीतून वाळू भरलेले ट्रॅक्टर किंवा ट्रक थेट शहरात प्रवेश करीत असतानाही कारवाई होत नाही, हे न उलगडणारे कोडेच आहे. त्यामुळे आता तरी त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सातीत ट्रॅक्टर केला जप्त
हिंगणघाट तालुक्यातील साती (वरुड) या परिसरात मोठ्या प्र्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती मिळताच हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुंदडा, नायब तहसीलदार विजय पवार व तलाठी सतीश झोरे यांनी गुरुवारी मध्यरात्री साती गाव गाठून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला. तो ट्रॅक्टर वरुड येथील बंडू उमाटे यांच्या मालकीचा असून त्याच्याविरुद्ध अल्लीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार मुंदडा यांनी दिली.