सर्वेक्षण आटोपले; 39 वाळूघाट पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:11+5:30
वाळू निर्गती सुधारित धोरण ३ सप्टेंबर २०१९मध्ये जाहीर करण्यात आले असून, या सुधारित धोरणानुसार वाळूघाट लिलावाची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांत वाळूघाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यांतील तब्बल ७७ वाळूघाटांचे प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले होते. त्यामुळे तालुका सनियंत्रण समितीकडून या सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण करण्यात आले.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा प्रशासनाला दरवर्षी खनिकर्म विभागामार्फत मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. यामध्ये वाळूघाटांतून मिळणारा महसूल सर्वाधिक असतो. त्यामुळे वाळूघाटांच्या लिलावाकरिता दरवर्षी प्रक्रिया राबविली जाते. सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार, गेल्यावर्षी वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला होता. परंतु, तीनवेळा फेरलिलाव घेतल्यानंतरही केवळ पाच घाटांचाच लिलाव झाला. यावर्षी तब्बल ३९ वाळूघाट लिलावासाठी पात्र असून, पर्यावरण अनुमतीनंतर या घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा होणार आहे.
वाळू निर्गती सुधारित धोरण ३ सप्टेंबर २०१९मध्ये जाहीर करण्यात आले असून, या सुधारित धोरणानुसार वाळूघाट लिलावाची प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यातील देवळी, आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाट या चार तालुक्यांत वाळूघाटांची संख्या अधिक आहे. या तालुक्यांतील तब्बल ७७ वाळूघाटांचे प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाला प्राप्त झाले होते. त्यामुळे तालुका सनियंत्रण समितीकडून या सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या महिना-दीड महिन्यांपासून तालुकास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार, सदस्य असलेले जलसंपदा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ भूवैज्ञानिक व महाराष्ट्र प्रदूषण निमंत्रक मंडळाचे प्रतिनिधी यांनी घाटांचे सर्वेक्षण पूर्ण केले. त्यामध्ये ३९ वाळूघाट लिलावाकरिता पात्र ठरले असून, येत्या ३ जानेवारीला या पात्र ठरलेल्या घाटांकरिता जनसुनावणी होणार आहे. त्यानंतर पर्यावरण अनुमतीकरिता प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
‘त्या’ घाटांचेही सर्वेक्षण
- गेल्यावर्षी हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई), येळी तर समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव - २, मनगाव व खुनी या घाटांचा पाच वर्षांकरिता लिलाव झाला. तर देवळी तालुक्यातील आपटी -१, हिवरा (का.),समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव -१ हे तीन घाट राखीव ठेवण्यात आले. याही घाटांचे सर्वेक्षण केले आहे. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्हा खनिकर्म विभागाकडे महसूल रक्कम भरण्याची सूचना केली जाणार आहे.
या घाटांचा होणार लिलाव
वर्धा नदी : आपटी : १, तांबा : १, हिवरा कावरे : १, दिघी-वडगाव, सायखेडा, सालफळ, सावंगी रिठ, धोची, हिवरा.
यशोदा नदी : टाकळी चना : १, सोनेगाव (बाई), टाकळी (दरणे), भगवा : १, भगवा : २
वणा नदी : शिवणी - १, शिवणी - २, सेवा - २, चाकूर, मनगाव, मेनखात, मांडगाव - १, मांडगाव - २, उमरा - औरंगपूर रिठ, पारडी, औरंगपूर रिठ - उमरा, बरबडी, वाकसूर, बोरगाव दातार, चिकमोह, टेंभा - पारडी, चिंचोली बु., खारडी - भारडी, गणेशपूर - बोरखेडी, शेकापूर (बाई), येळी, नांदरा रिठ, ढिवरी-पिपरी, सोनेगाव (धो.)
पोथरा नदी : काजळसरा
सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार, जिल्ह्यातील ७७ वाळूघाट प्रस्तावित करण्यात आले होते. तालुकास्तरीय सनियंत्रण समितीकडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, यापैकी ३९ वाळूघाट पात्र ठरले आहेत. जनसुनावणीनंतर पर्यावरण अनुमतीकरिता राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी