गतिरोधक उठले वाहनचालकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:00 PM2019-01-14T22:00:43+5:302019-01-14T22:01:08+5:30
वाहनांच्या गतीला ‘ब्रेक‘ लावण्याकरिता शहरातील विविध मार्गांवर गतिरोधक लावण्यात आले आहेत. मात्र, ते लावताना कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याने त्याचे नटबोल्ट बाहेर डोकावत असून वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहनांच्या गतीला ‘ब्रेक‘ लावण्याकरिता शहरातील विविध मार्गांवर गतिरोधक लावण्यात आले आहेत. मात्र, ते लावताना कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याने त्याचे नटबोल्ट बाहेर डोकावत असून वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे चित्र आहे.
काल-परवा छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर, आर्वी नाका व इतर महत्त्वाच्या, अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी बांधकाम विभागामार्फत कंत्राटदाराने राष्ट्रीय, राज्य मार्गांवर लावले जाणारे रम्बल स्ट्रीप असे मूळ नाव असलेले गतिरोधक लावले आहेत. मात्र, लावताना कमालीचा निष्काळजीपणा करण्यात आल्याने गतिरोधकांचे नटबोल्ट बाहेर डोकावत असून वाहतुकीकरिता ते धोकादायक ठरत आहेत. सोमवारी सकाळी अनेक चारचाकी, दुचाकी वाहने येथे नादुरुस्त झाली. गतिरोधकामुळेच वाहने नादुरुस्त झाल्याने वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसून आले. या गतिरोधकांमधील काही प्लेट्सना तडेही गेले आहेत. या मार्गावरून दिवसाला हजारो लहान-मोठी वाहने वेगाने धावतात. याशिवाय आर्वी नाका व अन्य प्रमुख चौकही वाहतुकीने सदैव गजबजलेले असतात.
एका रम्बल स्ट्रीप अर्थात गतिरोधकावर बांधकाम विभागातर्फे मोठा निधी खर्ची घालण्यात आला आहे. १४ हजार रुपये एका रम्बल स्ट्रीपची किंमत असून एकूण सहा ते सात ठिकाणी हे अत्याधुनिक गतिरोधक बसविण्यात आले आहेत. गतिरोधक नीट बसविण्यात न आल्यास वाहतुकीकरिता धोक्याचे ठरणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
‘त्याही’ गतिरोधकांची दुर्दशा
अपघातांची मालिका पाहता चार वर्षांपूर्वी केसरीमल कन्या शाळेसमोर दोन ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले होते. जड वाहतुकीमुळे कालांतराने या गतिरोधकांची दुर्दशा झाली. यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने डांबराच्या सहाय्याने गतिरोधकांची डागडुजी करण्यात आली. गतिरोधकांच्या फुटलेल्या प्लेट्स आणि त्याचे नटबोल्ट बाहेर आलेले असल्याने तेदेखील वाहतुकीकरिता तापदायक ठरत आहेत. या गतिरोधकांचेदेखील नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
उपअभियंत्यांनी केली कंत्राटदाराची कानउघाडणी
या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. ई. मून यांचे लक्ष वेधले असता त्यांनी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क करीत कानउघाडणी केली. तसेच गतिरोधक व्यवस्थित करण्याबाबत निर्देश दिले.