खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या यादव यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:57 PM2018-05-24T23:57:54+5:302018-05-24T23:57:54+5:30
मागील काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या अध्यक्षावर खोटे गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या अध्यक्षावर खोटे गुन्हे दाखल करीत अटक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात घडला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच शहर पोलीस ठाणे गाठत खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या रामनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यादव यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली.
बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामनगर परिसरात काही युवकांचे भांडण झाले. ते सोडविण्यास गेलेल्या युवा: परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्यावर सहायक पोलीस निरीक्षक यादव यांनी खोटे गुन्हे दाखल केले. इतकेच नव्हे तर रात्रीच त्यांना अटकही केली. युवा: परिवर्तन की आवाज ही एक सामाजिक संघटना आहे. अध्यक्ष निहाल पांडे उच्चशिक्षित असून कायद्याच्या चाकोरीत राहून ते सामाजिक कार्य करतात. या संघटनेतील कार्यकर्ते सुशिक्षित व शिक्षण घेणारे आहे. कुठेही गुन्हेगारी क्षेत्रात त्यांची नावे नाहीत. असे असताना बुधवारी रात्री आमंत्रण हॉटेलजवळ घडलेल्या प्रकारात निहाल पांडे यांना दोषी ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीवर दबाव टाकून तक्रारी नाव नमूद करून घेत जुन्या वैमनस्यातून यादव यांनी खोटे गुन्हे दाखल केले. या प्रकारामुळे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा ज्या महिलांसाठी आंदोलने केली, त्या महिलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. फिर्यादीनेही वकिलामार्फत अॅफीडेव्हीट करून देत दबावामुळे निहालचे नाव दिल्याची कबुली दिली. या प्रकारामुळे खोटे गुन्हे दाखल केल्याचे सिद्ध होते. यामुळे यादव यांना निलंबित करा, अशी मागणी महिला व कार्यकर्त्यांनी केली. यावर पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिलांचा जेवणास नकार
बुधवारी रात्री अटक केल्यानंतर निहाल पांडे यांना जेवणही यादव याने नाकारले. शिवाय सकाळीदेखील कुणाला भेटू दिले नाही. यामुळे शहर पोलीस ठाण्यात जमलेल्या महिलांनीही जेवणास नकार दिला. जामीण मिळाल्यानंतर निहाल यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.