बदलीकरिता मृत मुलगा जिवंत दाखविणारी शिक्षिका निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:08 PM2018-06-22T16:08:03+5:302018-06-22T16:08:11+5:30
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत मृत्यू झालेला मुलगा जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दाखवित जवळची शाळा मिळविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला चौकशीअंती निलंबित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत मृत्यू झालेला मुलगा जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दाखवित जवळची शाळा मिळविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला चौकशीअंती निलंबित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपाल अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. तर इतर शिक्षकांचा अहवाल तयार करून तो मार्गदर्शनाकरिता वरिष्ठांकडे मार्गदर्शनाकरिता पाठविला असल्याची माहिती आहे.
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत वर्धेत अनेक आश्चर्यजनक प्रकार घडले. यात एका शिक्षिकेने पती गडचिरोलीत असताना त्याचे वर्धेत एकत्रिकरण दाखविले तर दुसऱ्या एका शिक्षिकेने विवाहित असताना कुमारीका असल्याचे दाखविले. या दोघींपेक्षा एका शिक्षिकेने तर हद्दच केल्याचे समोर आले आहे. या शिक्षिकेने दोन वर्षांपूर्वी मृत्यू झालेला मतीमंद मुलगा जिवंत असल्याचे दाखविले. हे तिनही प्रकरण ‘लोकमत’ने उघड करताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली. ‘लोकमत’ चे वृत्त प्रकाशित होताच गृहविभागाने त्याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले.
या आदेशावरून चौकशी करण्यात आली असता यात अनेक प्रकार समोर आले आहे. जवळची शाळा मिळविण्याकरिता अनेक शिक्षकांनी अंतरात घोळ केल्याचे समोर आले आहे. यात एका शिक्षकाने २२ किलोमिटरचे अंतर ५२ किलो मिटर दाखविल्याचे समोर आले आहे. असे अनेक प्रकार चौकशी दरम्यान उघड झाले. असे अजब प्रकार करणाऱ्या तालुक्यातील १८ प्रकरणे आहेत.तर संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे ५२ प्रकरणे आहेत. या प्रकरणावर चौकशी पूर्ण झाली असून कार्यवाही करण्यासंदर्भात वरिष्ठांना मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
अंतराबाबत रापमचे प्रमाणपत्र ग्राह्य धरू नये
जिल्हातर्गत बदलीत अनेक शिक्षकांनी रापममधून अंतराचे प्रमाणपत्र आणले आहे. यात अनेक अंतर नियमात बसविण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे हा प्रकार शासनाची दिशाभूल करणारा आहे. म्हणूनच रपमचे अंमर ग्राह्य धरू नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने केली आहे.
मृत मुलगा जिवंत दाखविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या कल्पना गौतम (गवालपंची) नामक शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. बदलीत गैरप०कार करणाऱ्या शिक्षकांवरील ही पहिली कारवाई आहे. यानंतर अनेक शिक्षकांवर अशी कारवाई होण्याचे संकेत आहेत.
- सुभाष खिराळे, गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) वर्धा