स्वामी तीनही जगाचा, आईविना भिकारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:06 PM2018-03-17T22:06:47+5:302018-03-17T22:06:47+5:30
या जगात ज्याने आपल्या आई-वडीलांची सेवा केली तो सुखी आहे. तर या जगात ज्याने आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले तो दु:खी आहे. ज्या आई-वडिलांनी लहानपणी उपाशी राहुन तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपल्यास जपलं,....
ऑनलाईन लोकमत
घोराड : या जगात ज्याने आपल्या आई-वडीलांची सेवा केली तो सुखी आहे. तर या जगात ज्याने आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले तो दु:खी आहे. ज्या आई-वडिलांनी लहानपणी उपाशी राहुन तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपल्यास जपलं, त्यांनाच म्हातारपणी आपण घराबाहेर काढतो. ही भारतीय संस्कृती नाही. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाला उद्धारी’‘स्वामी तिनही जगाचा आई विना भिकारी’ असे आईबद्दल भावूक मत सप्त खंजेरी वादक बाल कीर्तनकार तुलसी हिवरे यांनी व्यक्त केले.
मोही येथील संत विदेदी मोहनबाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. महिलांवरील अत्याचाराला प्रबोधनातून यावेळी वाचा फोडण्यात आली. तसेच दारूबंदी, जातीयवाद आदी विषयावरही यावेळी प्रबोधन करण्यात आले. आज तुम्हाला आई पाहिजे, बहीन पाहिजे, पत्नी पाहिजे;पण तुम्ही मुलीला पोटातच मारण्याचे पाप का करता. ‘मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. आज महिला कोणत्या क्षेत्रात कमी नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करीत आहे. मग मुलगी जन्माली की पाप का समजता. तिची हत्या करू नका. तिला जन्माला येऊ द्या, असे भावनिक आवाहन यावेळी त्यांनी केले.
तुम्ही असे कार्य करा की, तुम्ही लोकांना हवे हवेशे वाटायला पाहिजे. तुमच्या मृत्यूनंतर तेरवी, चौदावी होईल;पण समाजासाठी असे कार्य करा की, तुमचेही पुण्यस्मरण व्हायला पाहिजे, असेही याप्रसंगी बालकीर्तनकार तुलसी हिवरे यांनी सांगितले. शेवटी राष्टÑसंतांची सामूहिक प्रार्थना व गाडगे महाराजांचे गोपाला... गोपाला...देवकी नंदन गोपाला... या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
नागपूर येथे पाचव्या वर्गात शिकणारी अकरा वर्षीय तुलसी यशवंत हिवरे हिने वयाच्या चवथ्या वर्षापासून कीर्तनाला सुरुवात केली. तिने आतापर्यंत ७१० कीर्तनाचे कार्यक्रम केले. तिला लंडन येथे वर्ल्ड आॅफ जिनीअस हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्टÑ शासनाने २०१६ ला राजरत्न पुरस्काराने तिला गौरविले आहे. मंडळातर्फे तुलसी हिवरे हिचा सत्कार करण्यात आला.