पालिकेच्या नवीन इमारतीसह जलतरण तलावाचे काम थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:41 PM2018-04-11T23:41:59+5:302018-04-11T23:41:59+5:30
नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.
न.प. निवडणूक काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. वर्धेकरांनी ते ग्राह्य धरत भाजपाला सत्ता दिली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी विकास कामांना प्रारंभही केला; पण याला पक्षच साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने शहर विकासासाठी आजपर्यंत १०० कोटींच्या वर निधी उपलब्ध करून दिला; पण तो बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला. यामुळे न.प. च्या तिजोरीत ठणठणाटच दिसतो. पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सुमारे १० कोटी गरजेचे असताना अद्याप निधीच देण्यात आला नाही. जलतरण तलावाचे नुतनीकरण केले जात आहे. यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये निधी अपेक्षित आहे; पण पालिकेला केवळ ३७.५० लाख रुपये मिळालेत. यामुळे जलतरणाचे काम रखडण्याची शक्यता आहे. निधीच मिळत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांतही कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.
उपहारगृह आणि उद्यानाचा प्रस्ताव रद्द
जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. यात ६० लाख रुपयाचे चार फिल्टर प्लाँट लावलेत. यातील दोन सुरु असताना दोन ‘स्टँड बाय’ असणार आहे. येथे स्प्रींग डायव्हींग, महिलांकरिता चेंजींग रूम व वॉश रूम तसेच टँकरच्या टाईल्स व वॉटर प्रुफींग करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी १० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असून पालिकेला ३७.५० लाख रुपयेच मिळाले आहेत. यामुळे उर्वरित काम कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. जलतरण तलावालगत मोकळ्या जागेवर उद्यान व उपहारगृह उभारणे प्रस्तावित होते; पण निधीच नसल्याने ते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
निधीची आशा धूसर
पालिकेच्या नवीन इमारत बांधकामासाठी १० कोटी व जलतरण तलाव नूतनीकरणास १ कोटींची गरज आहे. हा निधी अर्थसंकल्पात मिळण्याची अपेक्षा होती; पण तरतूदच करण्यात आली नाही. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट राहणार आहेत. पूढील वर्षीच्या अर्थसंकल्पाची शाश्वती नाही. यामुळे उर्वरित कामांसाठी निधी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. मग, ही कामेही अर्धवटच तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.