जुन्या पेन्शनकरिता प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:11+5:30
राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकडयांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या परंतु, टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन्शन योजनेस अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेचे (जीपीएफ) खाते बंद करू नये व अंशदायी (डीसीपीएस) कपात सुरू न करता शिक्षकांची जुन्या पेन्शन योजनेची खाती चालू ठेवावीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा १०० टक्के अनुदानित नसल्याने जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला असून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षक आमदारांच्या नेतृत्वात सेवाग्राम ते नागपूरपर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आहे. या आंदोलनाची सुरुवात गुरुवारी सकाळी सेवाग्राम आश्रमपासून झाली असून ही यात्रा नागपूर अधिवेशनावर धडकणार आहे.
राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकडयांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या परंतु, टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन्शन योजनेस अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेचे (जीपीएफ) खाते बंद करू नये व अंशदायी (डीसीपीएस) कपात सुरू न करता शिक्षकांची जुन्या पेन्शन योजनेची खाती चालू ठेवावीत. तसेच राज्यातील साठ हजार शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घ्यावी, या मागण्यांसंदर्भात शिक्षक आघाडीची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार आज गुरुवारी शिक्षक आमदारांच्या नेतृत्वात शकडो शिक्षकांनी सेवाग्राम ते नागपूर अशी पायदळ यात्रा सुरु केली आहे.
या यात्रेत प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी सेवाग्राम येथून निघालेली पदयात्रा १६ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार आहे. या सर्व मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही तर सभागृहात व सभागृहाबाहेर तीव्र आंदोलन करणार असल्याचे अमरावती विभागाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
या आंदोलनात पुणे विभागाचे आमदार दत्तात्रय सावंत, कोकण विभागाचे आमदार बाळाराम पाटील, नाशिकचे आमदार किशोर दराडे यांच्यासह असंख्य शिक्षकांचा सहभाग आहेत.
विनोबांच्या कर्मभूमीत यात्रेचे स्वागत
सेवाग्राम ते नागपूरपर्र्यंत निघालेल्या या पदयात्रेचे विनोबांची कर्मभूमी पवनार येथे स्वागत करण्यात आले. यावेळी पवनारचे बबलू राऊत, संगीता धाकतोड, रोशनी अवचट यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. पदयात्रेतील आमदारांनी ग्रामपंचायतला भेट दिली. सरपंच शालिनी आदमने, ग्रामविकास अधिकारी दिवटे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने स्वागत करुन विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.