बोर व्याघ्रात वाघांची संख्या रोडावल्याने ताडोब्यातील ‘टायगर’ करताहेत एन्ट्री?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:00 AM2022-04-03T05:00:00+5:302022-04-03T05:00:27+5:30
व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहे. जंगलाची सलगता असे वैशिष्ट्य असलेल्या या वाघांसाठी संरक्षित असलेल्या विस्तीर्ण परिसरात सध्या एकूण सहा प्रौढ वाघ-वाघिणींचे वास्तव्य आहे. यात चार वाघिणींचा तर बीटीआर-८ आणि बीटीआर-१० या दोन वाघांचा समावेश आहे. तर याच व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात रस्ता ओलांडताना २०१७ मध्ये मृत्यू झाला. तर बीटीआर-४ हा शिवाजी नामक वाघ मागील आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. एकूणच बोर व्याघ्रच्या कोअर आणि बफर झोनमधील वाघांची संख्या रोडावल्याने नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ थेट बोर व्याघ्र प्रकल्प असलेल्या वर्धा जिल्ह्यात एन्ट्री करीत असल्याचे बघावयास मिळत आहे.
विदर्भ देशाची व्याघ्र राजधानीच
- विदर्भात एकूण पाच व्याघ्र प्रकल्प असून ३०० चौ. कि.मी. चे परिक्षेत्र वाघांच्या वास्तव्यासाठी राखीव आहे. या आरक्षित जंगल परिसरात मोठ्या संख्येने वाघ असल्याने विदर्भ सध्या देशाची व्याघ्र राजधानीच ठरत आहे. विदर्भात ३०० हून अधिक वाघ आहेत.
वनपरिक्षेत्रात सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू
- वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या वनपरिक्षेत्रात मागील सात वर्षांत दोन वाघांचा मृत्यू झाला. या दोन वाघांपैकी एकाचा नैसर्गिक तर दुसऱ्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे.
- २५ ऑगस्ट २०१३ ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील मदना शिवारात वाघाचा तर १४ ऑक्टोबर २०१७ ला कारंजा वनपरिक्षेत्रात शेत सर्व्हे क्रमांक ७६/१ मध्ये वाघिणीचा मृतदेह सापडला होता.
जंगलाची सलगता
- जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ.कि.मी. तर नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.कि.मी. तसेच नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.कि.मी. आहे. जंगलाची सलगता हे बोरचे वैशिष्ट्य असून वाघांच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचेच ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
२०१८ मध्ये वर्ध्यात आला होता ताडोब्यातील वाघ
- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील एक अडीच वर्षीय तरुण वाघ नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वरोरा मार्ग वर्धा जिल्ह्यातील देवळीपर्यंत येत तो सुमारे ५०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशातील बैतुलच्या जंगलात गेला. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा वाघ वर्धा जिल्ह्यात आल्यावर त्याने वर्धा जिल्ह्यात मनुष्यावर हल्ला केला नाही. पण अमरावती जिल्ह्यात त्याने मनुष्याला ठार केले होते.
‘पुष्पा’ १९ मार्चपासून वनविभागाला गवसेना
- नैसर्गिक अधिवासाच्या शोधार्थ वर्धा शहराशेजारील पवनार शेत शिवारापर्यंत आलेल्या अडीच ते तीन वर्षे वयोगटातील वाघ आंजी (मोठी) पर्यंत जात पुन्हा पवनार शिवारात परतला. पण हाच वाघ १९ मार्चपासून वनविभागाला गवसलेला नाही. या वाघाच्या मागावर असलेले वन्यजीव प्रेमी त्याला लाडाने ‘पुष्पा’ संबोधित असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.