तहसीलदारांना कोंडताच कामांना गती
By admin | Published: May 12, 2016 02:19 AM2016-05-12T02:19:56+5:302016-05-12T02:19:56+5:30
रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर दुरूस्तीचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते.
शेतकऱ्यांचे आंदोलन : तीन वर्षांपासून प्रलंबित विहीर दुरूस्ती प्रक्रियेला वेग
आर्वी : रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर दुरूस्तीचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. बुधवारी शेतकरी व भाजयुमो जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी आंदोलन करीत तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना त्यांच्या कक्षात कोंडून ठेवले. या आंदोलनाचा धसका घेत गुरुवारपासून मनरेगा अंतर्गत मंजूर विहिरींचे अंदाज -पत्रक तयार करण्याचे काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली.
२०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दुरूस्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी अनुदानही जाहीर करण्यात आले. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयाने २०१३ मध्येच तयार करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पाठविली; पण त्यांनी अभियंता नसल्याने विहीर दुरूस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे शक्य नसल्याचे कारण देत काम ठप्प ठेवले. शेतकऱ्यांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली. याची दखल घेत त्यांनी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पंचायत समितीकडे १८ मोर्च रोजी सोपविले; पण पंचायत समितीच्या अभियंत्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. याचा फटका शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला बसला. यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळा जगताप यांच्याकडे समस्या मांडल्या.
यावरून जगताप यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयातील कक्ष गाठला. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना कक्षातच कोंडून ठेवले. जोपर्यंत अंदाज पत्रकाचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत कक्ष सोहणार नाही, असा निर्धार जाहीर करण्यात आला. परिणामी, तहसीलदार मस्के यांनी पं.स. गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, अभियंता दौलतकर, तालुका कृषी अधिकारी खेडकर यांना बोलवून चर्चा केली. तीन अभियंत्याचे सहकार्य घेत गुरुवारपासून कामाला सुरुवात करून चार दिवसांत अंदाजपत्रक तयार करून देण्याची ग्वाही दिली. या आंदोलनामुळे तीन वर्षांपासून प्रलंबित समस्या मार्गी लागली.
आंदोलनात भाजप शहर उपाध्यक्ष सुधीर जाचक यांच्यासह सुरज राठोड, परसराम राठोड, अंबादास लक्षणे, मारोती साठे, धनंजय महाजन, नरेश चव्हाण, कुवरसिंग राठोड, युवराज चव्हाण, रामदास जाधव, कैलास अवथळे, प्रफूल वाळके, भास्कर जाधव, राजू आगरकर, संतोष गौरकार, विक्रम भगत आदींनी सहभाग घेतला.(तालुका/शहर प्रतिनिधी)
चार दिवसांत होईल अंदाजपत्रक तयार
२०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींची दुरूस्ती करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला; पण अद्याप प्रक्रियाच पूढे सरकली नव्हती. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांनाच त्यांच्या कक्षात कोंडले. परिणामी, चार दिवसांत अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांशी चर्चा करून दिली.