पिचकारी बहाद्दरांना तहसीलदारांनी दिला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:40 PM2019-03-09T23:40:45+5:302019-03-09T23:41:20+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन तहसील कार्यालयात आलेल्यांना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले. तहसील कार्यालयाच्या इमारतीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन भिंतीवर आणि कोपऱ्यात पिचकाऱ्या उडविणाऱ्यांना तहसीलदारांच्या आदेशवरुन प्रत्येकी दोनशे रुपयाचा दंड ठोठावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन तहसील कार्यालयात आलेल्यांना दंडात्मक कारवाईला समोरे जावे लागले. तहसील कार्यालयाच्या इमारतीत तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन भिंतीवर आणि कोपऱ्यात पिचकाऱ्या उडविणाऱ्यांना तहसीलदारांच्या आदेशवरुन प्रत्येकी दोनशे रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे ‘येथे थुंकणे बरे नव्हे’ असे समजून इतरांनी मात्र तंबाखुजन्य पदार्थाची थुंकी गिळण्यातच धन्यता मानली.
तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, विक्री व जाहिराती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करिता प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविली जात आहे. पण, काही कार्यालयातील अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शनिवारी अंतिम तारीख असल्याने नागरिकांनी नवनिर्मित तहसील व उपविभागीय कार्यालयात एकच गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्यापैकी काहींनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करुन इमारतीच्या भिंती व कोपºयात तोंडातील पिचकारी टाकून भिंती रंगवायला सुरुवात केली होती. हा प्रकार तहसीलदार प्रीती डुडुलकर व नायब तहसीलदार डॉ. पाराजे यांच्या लक्षात येताच त्यांनी तंबाखू नियंत्रण कायद्याचा आधार घेत कारवाईचा बडगा उगारला. भिंती रंगविणाऱ्यांचा शोध घेत कारवाई करण्यासाठी एका कर्मचारी नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयाने शनिवारी दुपारपर्यंत २३ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्या कडून २ हजार ८०० रुपयाचा दंडही वसूल केला. हा दंड कोषागार कार्यालयात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे अनेकांना धडकी भरली असून अशीच कारवाई कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्व कार्यालयांत अंमलबजावणीची गरज
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासोबतच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व विक्री करणे कायद्याने गुन्हा असतानाही शासकीय कार्यालयात याला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांत याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाहीची गरज आहे.