‘त्या’ घटनेतील आरोपींवर कारवाई करा
By admin | Published: March 8, 2017 01:46 AM2017-03-08T01:46:09+5:302017-03-08T01:46:09+5:30
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी सवर्ण नराधमांनी दलित महिलेवर बलात्कार केला.
विकृत मानसिकतेचा निषेध : बसपाचे जिल्हा प्रशासनाला साकडे
वर्धा : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी सवर्ण नराधमांनी दलित महिलेवर बलात्कार केला. तिला अमानुषपणे जिवंत जाळल्याची घटना समोर आली. यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बसपाने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन सादर केले.
महिलेवर अत्याचार झाल्याची जबानी पोलिसांना देऊनही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाणीपुर्वक घटनेवर पडदा टाकण्याचा प्रकार केला आहे. या महिलेने अत्याचार करणाऱ्या सात लोकांची नावे घेतली असून त्यांना पोलिसांनी अद्याप अटक न करता पाठीशी घालण्याचा प्रकार केला. ही बाब निंदनीय आहे. या नराधम आरोपी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे. प्रकरणाला वाचा फोडणारे बसपा पदाधिकाऱ्यांना पोलीस लक्ष्य करीत असून या प्रकरणी कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना मंडळ समन्वयक अॅड. सुनील डोंगरे, जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, उपाध्यक्ष भास्कर राऊत, दीपक भगत, सुरेश दुधे, भालेराव, जि.प. सदस्य मनीष पुसाटे आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)