शुभांगी मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:24 PM2018-04-07T23:24:54+5:302018-04-07T23:24:54+5:30
मृत शुभांगी उईके हिच्या मृत्यूबाबत पोलीस आत्महत्या म्हणत असले तरी तिच्या कुटुंबीयांच्या मते आणि मिळालेल्या माहितीनुसार तिची आत्महत्या नसून हत्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मृत शुभांगी उईके हिच्या मृत्यूबाबत पोलीस आत्महत्या म्हणत असले तरी तिच्या कुटुंबीयांच्या मते आणि मिळालेल्या माहितीनुसार तिची आत्महत्या नसून हत्या आहे. याकरिता सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. चारुलता टोकस यांनी केली.
शुक्रवारी त्यांनी मृत शुभांगी उईके हिच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी मृत शुभांगीच्या आईला सांत्वना देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना त्यांनी शुभांगीच्या मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात हयगय होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. परिस्थितीजन्य पुराव्यावरुन ती हत्याच आहे, तसेच तिच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अन्यथा महिला काँगे्रसकडून तीव्र आंदोलन करण्यांचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिचे सचिव शेखर शेंडे, जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष हेमलता मेघे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विपीन राऊत, सुधीर पांगुळ, माजी सभापती व जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष निलीमा दंडारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.