शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:56 AM2018-10-04T00:56:11+5:302018-10-04T00:58:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट: येथील पंचायत समिती च्या कार्यालयात मागील ४० वर्षा पासून असलेला छत्रपती शिवराय यांचा पुतळा भंगलेला असल्याचे सांगून, तो पुतळा अवघ्या ४० रूपयात भंगरात विकणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी तालुका प्रगतीशील मराठा समाजाच्यावतीने केली. या मागणीचे बुधवारी तहसीलदार व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
पंचायत समितीच्या कार्यालयातील पुतळा दिसत नसल्याने पुतळयाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा पुतळा केव्हाचाच भंगला व तो भंगारात टाकून विकल्याचे बेजबाबदार उत्तर अधिकाºयांनी दिले. महितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, शिवछत्रपतीचा पुतळा भंगारात विकण्याची अनुमती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य),जि.प. वर्धा यांनी दिली आहे. थोर रयतेच्या राजाचा पुतळा भंगार म्हणून ४० रुपयात विकताना पं.स.व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना काहीच कसे वाटले नाही. ही चितेची बाब असून या नीच कृत्यामुळे समाजात सर्वत्र असंतोष निर्माण झालेला असून या दोन्ही दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. माहितीच्या अधिकारात या पुतळया बाबत कालबाह्य असा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. हा शब्द प्रयोग करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आलेली आहे. त्वरित कारवाई न झाल्यास समस्त मराठा समाजातर्फे आंदोलनात्मक भूमिका घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी दोषी अधिकारी व शासकीय यंत्रणेची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शरद शिर्के, यशवंत शिंदे, हर्षल सालुंखे,प्रकाश लंके, विजय थोरवत, अक्षय भांडवलकर, अभिषेक चव्हाण, अक्षय निकम, अनिकेत निकम, नितिन भोसले,श्याम जाधव, प्रशांत गावंडे, निखिल लोंढे, विजय भाडवलकर, रामभाऊ नरवडे, सचिन सावंत, निखिल लोंढे, वैभव काले, सूरज माने, प्रल्हाद जाधव, रविन्द्र खडतकर, विलास जगताप, श्याम इडेपवार यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. निवेदन देतांना समाज बांधवांनी तहसीलदार आणि पोलीस निरिक्षक यांच्याशीही सबंधित विषयावर चर्चा केली. त्यामुळे आता शहरातील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा प्रश्न चांगलाच गाजण्याच्ी शक्यता निर्माण झाली असून प्रशासन काय दखल घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.