भरपाई टाळणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करा; वर्ध्यात घेतला खरीप हंगामपूर्व आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2023 18:28 IST2023-05-10T18:27:42+5:302023-05-10T18:28:08+5:30
Wardha News नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. मात्र, कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येतात. अशा कंपन्यांवर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भरपाई टाळणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करा; वर्ध्यात घेतला खरीप हंगामपूर्व आढावा
वर्धा : अलीकडे कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने याबाबतचा योग्य सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. मात्र, कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येतात. अशा कंपन्यांवर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, आमदार रणजित कांबळे, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समिर कुणावार, आमदार दादाराव केचे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली योजना आहे. ज्या ठिकाणी यंत्रणेने पुढाकार घेऊन ही योजना राबविली तेथे त्याचा फायदा झाल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी काही दिवसांत चांगली योजना आपण तयार करतो आहोत. या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजेत. शेताच्या फवारणीचे काम ड्रोन आधारित होणे आवश्यक असून, याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
एखाद्याच्या थकबाकीसाठी साऱ्यांचीच वीज खंडित करू नका
एखाद्या डीपीवरील काही शेतकरी थकीत असल्यास डीपीचा वीज पुरवठा बंद केला जातो. यामुळे नियमित देयके अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे अशा डीपीवरील वीजपुरवठा बंद करू नये, असे निर्देश पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांसाठी सोलर फीडर बसवत आहोत. त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.