भूखंड माफियांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:22 PM2017-11-06T23:22:40+5:302017-11-06T23:22:53+5:30
जिल्ह्यात शासकीय भूखंडावर आर्थिक सक्षम लोकांनी अतिक्रमण करून ते हडप केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात शासकीय भूखंडावर आर्थिक सक्षम लोकांनी अतिक्रमण करून ते हडप केले. सावंगी (मेघे) येथील शेत सर्व्हे क्र. १५५ मधील रेल्वेची हद्द असलेली जागा ओपन स्पेस दाखवून कर्मचाºयांशी संगणमत करीत ले-आऊट मंजूर करून घेतले. प्लॉटही विकलेत. त्या ले-आऊटची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी जनसुरक्षा परिषदेने केली. याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले.
अनेक ले-आऊट धारकांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून अवैधरित्या ले-आऊट विकसित करीत जनतेची फसवणूक केली. यातून कोट्यवधीची मालमत्ता जमा केली. आलोडी येथील स्मशान भूमीच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण हटविण्यास ग्रा.पं. प्रशासन व वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करीत आहे. गोपुरी ते साटोडा हा २४ मीटरचा रस्ता असून तेथे रस्त्यालगतच्या धनदांडग्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे तो रस्ता अत्यंत अरूंद झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे जागांची मोजणी करीत रस्ता मोकळा करणे तथा ले-आऊटची कसून चौकशी करणे गरजेचे झाले आहे.
आर्वी नाक्यावरील वसाहतीत ४० वर्षापूर्वीपासून वडर समाज वास्तव्य करून आहे. या गरीब लोकांना जमिनीचे मालकी हक्क देण्यात यावे. इंदिरा आवास योजनेतून शासनाने बांधून दिलेल्या झोपड्यांवर ले-आऊट धारक ग्रा.पं. ला हाताशी धरून बळजबरीने व शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग करून झोपड्यांची जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सावंगी (मेघे) येथील शेत सर्व्हे क्र. १५५ येथील ले-आऊटही अवैधरित्या विकसित करण्यात आले आहे. शिवाय भूखंड क्र. ८१/१ आलोडी, भूखंड क्र. २७ नालवाडी, भूखंड क्र. ७२/२ या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या प्रकरणी चौकशी करावी तथा दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी परिषदेने केली. निवेदन देताना अध्यक्ष भास्कर भगत, सूर्यभान तिडके, अशोक देशमुख, नागोराव पवार, अरुण गावंडे, रमेश सोनटक्के, प्रदीप वाघमारे, गजानन जाधव, रमेश सावळे, दिवाकर हेलगे आदी उपस्थित होते.