अतिक्रमित पांदण रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By Admin | Published: April 27, 2017 12:47 AM2017-04-27T00:47:21+5:302017-04-27T00:47:21+5:30
पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच शिल्लक नसल्याचे दिसते.
पालकमंत्री पांदण रस्ते योजना : मोबाईल अॅपची सुविधा
वर्धा : पांदण रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच शिल्लक नसल्याचे दिसते. मात्र पालकमंत्री पांदण रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यातील अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहे. यात आर्वी व हिंगणघाट तालुक्यातील अतिक्रमित पांदण रस्ते मोकळा श्वास घेत असून याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी प्रशासनाने मोबाईल अॅप तयार केले. तसेच संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना यामुळे जिल्हास्थळी येऊन माहिती देण्याची गरज नाही. यात वेळ आणि श्रम वाचत आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्याला दोन पोकलँड मशीन प्राप्त झाल्या असून शेतकरी किंवा गावकऱ्यांना अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करून अडचणी दूर करण्यासाठी आॅनलाईन करावे. यासाठी प्रति दिवसाकरिता २ हजार ५०० रूपये भरून मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
शेतकऱ्यांकरिता जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये अतिक्रमित पांदण रस्ते, गावरस्ते, वाहिपेरीसाठी असलेल्या वहिवाटा मोकळ्या नसल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन शेतीविषयक कामे करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात अतिक्रमण मुक्त पांदण रस्ते योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील दारोडा व आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात आले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)