पीककर्जाबाबत खबरदारी घ्या

By admin | Published: May 8, 2016 02:21 AM2016-05-08T02:21:02+5:302016-05-08T02:21:02+5:30

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शनिवारी आयोजित कर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Take care about the crop | पीककर्जाबाबत खबरदारी घ्या

पीककर्जाबाबत खबरदारी घ्या

Next

आशुतोष सलिल : शेतकऱ्यांकरिता कर्ज मेळावा
वर्धा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शनिवारी आयोजित कर्ज मेळाव्यात शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बॅँकांनी पुढाकार घ्यावा, तसेच जिल्हा प्रशासनाने एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केल्या.
वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विकास भवन येथील पीक कर्ज मेळावा आयोजित होता. या पहिल्याच मेळाव्यात सुमारे ४०० शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन पीक कर्जाची प्रकरणे विविध बॅँकेच्या अधिकाऱ्यांना सादर केली. यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार तसेच पटवाऱ्याने कर्ज प्रकरणांसाठी आवश्यक कागदपत्र कर्ज मेळाव्यातच उपलब्ध करून दिले.
देवळी येथे तहसील कार्यालयात आयोजित कर्ज मेळाव्यात ८०० ते ९०० शेतकरी उपस्थित होते. पीक कर्जाबाबतचे प्रस्ताव या कर्ज मेळाव्यात सादर करताना कर्जाचे पुनर्गठन व ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा कर्ज घेतल्याच्या नोंदी नाहीत, अशी सर्व प्रकरणे स्वीकारण्यात आली. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना आवश्यक असलेला सातबारा घरपोच देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सातबारा उपलब्ध झाला नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ सातबारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केल्या. त्यांनी देवळी येथे भेट देत शेतकऱ्यांशी संवादही साधला.


शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

वर्धेत विकास भवन येथे खरीप पीक कर्जासाठी तसेच पुनर्गठणाबाबत शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूकही या मेळाव्यात करण्यात आली. चालू वर्षातील पीक कर्ज परतफेड, सन २०१४-१५ चे पुनर्गठन, २०१५-१६ चे पीक कर्ज आदी बाबतीत शेतकरी नरेंद्र घाडगे, मधुकर पोळ, वासुदेव महाळकर, शशीकांत पोळ, विठ्ठल खेडेकर, विश्वनाथ पाहुणे, भीमराव नाखले, किशोर पाहुणे, योगेश पोळ, संदीप पोळ, गणेश पाहुणे, शशीकांत पोळ, संतोष पाहुणे, नरसिंग भोकरे, किसना किनकर, निलेश किनकर यांनी शंका उपस्थित केल्या. त्यांच्या शंकाचे निरसन जिल्हाधकारी आशुतोष सलील, जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा यांनी केले.

तालुकास्तरावर निराशा
देवळी : येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता असलेल्या पीककर्ज मेळाव्यात बॅँक प्रशासन व शासनात असलेल्या धोरणात्मक अभावामुळे कास्तकारांची निराशा झाली. मेळाव्यात कोणत्याही कास्तकारांना आॅनलाईन सात बारा मिळाला नसल्याने गत वर्षीच्या थकीत कर्जदारांचे पुर्नगठन न करण्याचे काही बॅँकांनी सांगितल्यामुळे कास्तकारांत गोंधळाची स्थिती होती. एकीकडे गत वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यासोबतच हस्तलिखीत सातबारा देणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात कास्तकारांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप होत रोष व्यक्त करण्यात येत आहे. मेळाव्याला भारतीय स्टेट बॅँक, महाराष्ट्र बॅँक, कॅनरा बॅँक, बॅँक आॅफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅँक, नागरी बॅँक तसेच बॅँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यासोबतच नायब तहसीलदार बाळू भागवत व नायब तहसीलदार एस.व्ही. ढोके यांची उपस्थिती होती. तहसीलदार तेजस्वीनी जाधव रजेवर असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. तालुक्यातील अंदोरी, गिरोली, पुलगाव, देवळी, विजयगोपाल, भिडी व परिसरातील गावातील दीड हजार कास्तकारांना ५ व ६ मे रोजी आॅनलाईन सातबाऱ्याचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी अर्जही सादर केले.

Web Title: Take care about the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.