एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, ही खबरदारी घ्या!

By admin | Published: September 17, 2015 02:37 AM2015-09-17T02:37:24+5:302015-09-17T02:37:24+5:30

शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

Take care that one farmer will not commit suicide. | एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, ही खबरदारी घ्या!

एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, ही खबरदारी घ्या!

Next

वर्धा : शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यासोबतच यापुढे आपल्या गावात एकही आत्महत्या होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी बैठकीत दिल्या.
विकास भवन येथे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामस्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात आढावा घेताना किशोर तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती उपस्थित होते.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात आढावा घेताना तिवारी म्हणाले, शेतकरी आत्महत्यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांना संवेदनशीलपणे काम करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्तरावर कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवक ते शिक्षकापर्यंत सर्वांनी गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. ज्या भागात नैराश्यमधून अथवा विविध कारणाने आत्महत्या झाल्यास त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महसूल, जलसंधारण आदी विभागांच्या अधिकऱ्यांनी आत्महत्या होत असलेल्या भागात भेट देऊन शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा प्रत्यक्ष लाभ पोहचवतानाच त्यांच्या जीवनात काय परिवर्तन झाले या संदर्भातही माहिती घेण्याची आवश्यकता व्यक्त करीत कृषी विभागाने पारंपारिक पद्धतीने शेती न करता किफायतशीरपणे शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
तेलबिया, भाजीपाला, फळे आदी बाजरपेठेच्या मागणीनुसार पीक परिस्थितीत बदल केल्यास शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. पुढील तीन महिन्यात कृषी कारणाने एकही आत्महत्या होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सुलभपणे आरोग्य सुविधांचा लाभ न मिळाल्यामुळे विवंचनेतून नैराश्य येण्याच्या घटना घडणार नाही, यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनांसोबतच सर्वच योजनांचा लाभ सातबारा असणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. शासनाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसेच टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणशुल्क माफ केले आहे. ज्या शैक्षणिक संस्था शिक्षण शुल्क घेतील, अशा संस्थाचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी विविध योजनांचा एकत्रितपणे शेतकऱ्यांना लाभ पोहोचवितांनाच आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. संचालन निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Take care that one farmer will not commit suicide.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.