सर्वेक्षण करुन तात्काळ नुकसान भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:26+5:30
होळीच्या उत्साहावर अवकाळी पावसाने विरजण घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांनी सभागृहात केली. त्यामुळे सर्वानुमते यासंदर्भात ठराव घेण्यात आला. यासह इतरही सदस्यांनी विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील पाच तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास १ हजार ७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या निसर्गकोपामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेतला असून तो शासनाला पाठविला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदचे अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष वैशाली येरावार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती मृणाल माटे, पशुसंवर्धन व कृषी समिती सभापती माधव चंदनखेडे व समाजकल्याण समिती सभापती विजय आगलावे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजित बंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, लेखा व वित्त अधिकारी शेळके यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
होळीच्या उत्साहावर अवकाळी पावसाने विरजण घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांनी सभागृहात केली. त्यामुळे सर्वानुमते यासंदर्भात ठराव घेण्यात आला. यासह इतरही सदस्यांनी विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेऊन कोरानाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्याच्या सूचनाही संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
स्वतंत्र ग्रामपंचायतीला हिरवी झेंडी
वर्धा शहरातलगत असलेल्या आलोडी व साटोडा या दोन गावांमिळून साटोडा येथे गट ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीकडून आलोडी वासियांना सेवा पुरविण्यात नेहमीच दुजाभाव केला जातो. या परिसरात अनेक कामे प्रलंबित असतांना दुर्लक्ष केले जात असल्याने आलोडीवासीयांनी जिल्हा परिषदेला निवेदन देऊन आलोडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची मागणी केली होती. हा प्रश्न आज स्थायी समितीमध्ये घेऊन आलोडी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव शासनाकडे जाणार असून शासनाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
गोपालकांना नुकसान भरपाई द्या
उशिरापर्यंत आलेल्या पावसामुळे सध्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात ढोरकाकडा ही विषारी वनस्पती उगवली आहे. ही वनस्पती खाल्याने जनावरे दगावत आहे. सेलू तालुक्यासह इतरही तालुक्यामध्ये ही वनस्पती खाल्ल्याने जनावरे दगावली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय करणाºया गोपालकांना दुधाळ जनावरे दगावल्याने मोठा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, यासंदर्भातही स्थायी समितीच्या बैठकीत ठराव घेण्यात आला.
राष्ट्रीयीकृत बँकेतच गुंतवणूक करा
सध्या खासगी बँकात गुंतवणूक करणे अडचणीचे ठरत असल्याने जिल्हा परिषदेतील घसारा व घसारा पुनर्स्थापन फेरगुंतवणूक ही राष्ट्रीयकृत बँकेतच करावी, अशी मागणी माजी अध्यक्ष तथा भाजपा गटनेते नितीन मडावी यांनी केली. सोबतच हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) सर्कलमधील काजळसरा येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी या इमारतीचे लोकार्पण झाले नाही. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांरी उपलब्ध करुन दिल्यास इमारत सेवेत येईल, या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.