प्रत्येक कामाचे छायाचित्र घ्या
By admin | Published: June 10, 2015 02:11 AM2015-06-10T02:11:10+5:302015-06-10T02:11:10+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण, भूजल पुनर्भरणाच्या कामांचा दर्जा व कामांबाबत संपूर्ण माहिती ग्रामसभा व लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी.
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण, भूजल पुनर्भरणाच्या कामांचा दर्जा व कामांबाबत संपूर्ण माहिती ग्रामसभा व लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी. काम सुरू करण्यापूर्वी तसेच काम संपल्यानंतरची संपूर्ण छायाचित्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मंगळवारी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियानातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. सभेला जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अपर जिल्हाधिकारी संजय भागवत तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विशेष निधी तसेच जिल्हा नियोजन मंडळातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २१४ गावांत ९४४ जलसंधारणाची सुरू आहे. या कामांत पारदर्शकता असावी, यासाठी प्रत्येक कामांबाबत लोकप्रतिनिधी व संबंधित ग्रामपंचायतींना केलेल्या कामांबाबत माहिती देण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले की, कृषी, लघुसिंचन, जिल्हा परिषद, वनविभाग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा तसेच सामाजिक वनीकरण विभागाने ३० जूनपर्यंत अधिकाधिक कामे पूर्ण करावीत. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याला शासनाची प्राथमिकता असून या अभियानात लोकसहभाग वाढावा, यासाठी ग्रामस्तरावर विशेष प्रयत्न करावेत. या कार्यक्रमामुळे भूगर्भातील जलसाठ्यात वाढ करणे, संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करून शेतीलाही शाश्वत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असल्याने गाव तलावासह नाल्यांचे खोलीकरण तसेच सिमेंट नाला बांधकामांना प्राधान्य देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी सलील यांनी सांगितले.
जलसंधारणाची सुरू असलेली सर्व कामे आॅनलाईन पद्धतीने नोंदविण्यात येत असून गावनिहाय आराखड्यानुसार प्रस्तावित कामे व पूर्ण झालेल्या कामांची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कामाचे छायाचित्रही राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.या अभियानातील कामांमुळे निर्माण झालेले जलसाठे तसेच भूगर्भातील झालेली वाढ नोंदविण्यासाठी निरीक्षण विहिरींच्या नोंदी अद्यायावत ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
कामांच्या निवीदा मंजूर झाल्यानंतर तसेच कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही ज्या कंत्राटदारांनी कामे सुरू केली नाही, अशा कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टेड करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सलील यांनी दिल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. यावेळी जलतज्ज्ञ मनोहर सोमनाथे, उपविभागीय महसूल अधिकारी घनश्याम भूगावकर, स्मीता पाटील, फडके, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रवीण बडगे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भूयार, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
विभागनिहाय कामांचा आढावा घेताना राज्य जलसंपदा विभागातर्फे ७० कामे प्रस्तावित असून त्यापैकी २३ कामांच्या निवीदा देण्यात आल्या आहेत. २५ कामे सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे १०७ कामे प्रस्तावित असून यात नालासिमेंट बांधाची ३३ कामे, गाळ काढणे व दुरुस्तीची ६४ कामे घेण्यात आलेली आहेत. भूजल सर्वेक्षण विभागातर्फे १० गावांत ४८ उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वनविभागातर्फे ८२ कामे प्रस्तावित असून ३१ कामे पूर्ण झाली आहेत. पाणी पुरवठा विभागातर्फे ७७ कामे प्रस्तावित असून ४० कामे पूर्ण झाली तर ३३ कामे प्रगतीपथावर आहेत. कृषी विभागातर्फे ५५५ कामे सुरू असून नाला खोलीकरण, ग्रेडेड बंडिंग आदी कामे सुरू आहेत.
जलयुक्त शिवार अभियानात २१४ गावांची निवड करण्यात आली असून कृषी विभागातर्फे ५५५ कामांवर १८ कोटी ६७ लाख रुपये खर्चाची कामे घेण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे १०७ कामांवर ७ कोटी ९५ लाख रुपये, राज्यस्तरीय लघुसिंचन विभागातर्फे ७० कामांवर १५ कोटी १५ लाख रुपये, वनविभागाच्या ८२ कामांवर १ कोटी ५४ लाख रूपये, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या ४८ कामांवर १ कोटी ९७ लाख रुपये, सामाजिक वनीकरण विभागाच्या ५ कामांवर ६ लाख ३२ हजार रुपये कामांना मान्यता देण्यात आलेली आहे. यापैकी बहुतांश कामे सुरू झाली असून जी कामे अद्याप सुरू झाली नाहीत वा निविदा प्रक्रिया झालेली नाही, अशी कामे बदलवून जलसंधारणांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही आढावा बैठकीत देण्यात आल्या.