शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी समता परिषदेचे धरणे
By Admin | Published: April 6, 2017 12:09 AM2017-04-06T00:09:29+5:302017-04-06T00:09:29+5:30
कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने
शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध : नायब तहसीलदारांना निवेदन
समुद्रपूर : कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने बुधवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी नायब तहसीलदार लता गुजर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
महाराष्ट्रात शेतीसाठी पुरेशी वीज नाही. सिंचनाच्या सोयी नाहीत. दुष्काळात शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली जात नाही. शेतात पिकले तर उद्योगपतींना धार्जिण्या धोरणामुळे उत्पादन खर्चाएवढा भाव मिळत नाही. भाजप सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्येचा आकडा सात हजारांवर गेला; पण कर्जमाफीसाठी शासनाकडे पैसे नसल्याची सबब समोर केली जात आहे. याचा समता परिषदेने निषेध केला.
म. फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देत शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व शासनाच्या धोरणामुळे त्यांना आत्महत्येकडे नेणारी अवस्था विषद केली. सरकार आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे नमूद केले. यानुसारच समता परिषदेने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी व विधानसभेत शेतकऱ्यांसाठी निलंबित व्हावे लागलेल्या आमदारांना पाठींबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याची सुरुवात तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करीत एकदिवसीय धरणे आंदोलनाने झाली.