शाळा सकाळच्या सत्रात घ्या; ‘झेडपी’च्या सीईओंचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:48 PM2019-06-27T21:48:28+5:302019-06-27T21:48:45+5:30
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि वातावरणातील प्रचंड उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश निर्गमित केले आहे. त्यामुळे आता शुक्रवारपासून सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात होणार आहे.
शासनाच्या धोरणानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जूनपासून नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी गावांमध्ये आणि शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. वातावरणातील प्रचंड उकाडा, वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे इत्यादी कारणांमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. परिणामी दिवसभर विद्यार्थी बेचैन झाले असून आजारी पडण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान पंधरा दिवस तरी शाळा सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.
विद्यार्थ्यांचा विचार करुन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी लागलीच २८ जूनपासून १३ जुलै २०१९ पर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश दिले. सकाळी ७ वाजतापासून १२ वाजतापर्यंत शाळा घेऊन शाळांचे कामकाज प्रभावित होणार नाही; यासोबतच सध्याची परिस्थिती लक्षात घेता आवश्यक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने शाळांची वेळ सकाळी ७ वाजतापासून तर दुपारी १२ वाजतापर्यंत ठरवून देण्यात आली असून सकाळी ७ ते ७.२० पर्यंत प्रार्थना व परिपाठ होईल. त्यानंतर तासिकेला सुरुवात करुन दुपारी १२ वाजता शेवटची ८ वी तासिका होईल.