सत्कारापेक्षा समाजकार्याचा वसा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:54 PM2018-11-22T21:54:42+5:302018-11-22T21:55:28+5:30
समाज, कुटुंबाने ज्यांना नाकारले आहेत. जे अनाथ झाले आहेत. अशा अनाथांसाठी कार्य करताना मी ज्या रस्त्याने भीक मागत फिरत होते. ज्या ठिकाणाहून मला समाजाने नाकारले होते. त्याच ठिकाणी माझा सत्कार होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाज, कुटुंबाने ज्यांना नाकारले आहेत. जे अनाथ झाले आहेत. अशा अनाथांसाठी कार्य करताना मी ज्या रस्त्याने भीक मागत फिरत होते. ज्या ठिकाणाहून मला समाजाने नाकारले होते. त्याच ठिकाणी माझा सत्कार होत आहे. याचा मला अभिमान आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
पिपरी (मेघे) येथील सासर-माहेर समितीच्यावतीने ७१ व्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, शंकरप्रसाद अग्निहोत्री, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थितीत होते. खासदार तडस म्हणाले, आईने अनाथांसाठी केलेले कार्य शब्दात सांगता येणार नाही. त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा, यासाठी मी सरकारकडे मागणी करणार आहे, असेही ते म्हणाले. माजी खासदार दत्ता मेघे म्हणाले, माझ्या नागपूर येथील साई अनाथ आश्रमामध्ये ६० मुले आणि वर्धा येथील आश्रमात ३५ मुली आहेत. त्यांचे शिक्षण, पालनपोषणाचा खर्च माझ्या संस्थेतर्फे करण्यात येतो. याची प्रेरणा मी सिंधू यांच्या पासूनच घेतली आहे. यावेळी बोलताना सिंधूताई सपकाळ म्हणाल्या की आजपर्यंत २२ देशांमध्ये माझा सत्कार झाला. मी ज्या देशात जाते आणि जिथे माझा सत्कार करण्यात येतो. तेथे वास्तव्यास राहणारे मराठी लोक येऊन मला जय महाराष्ट्र म्हणतात. तेव्हा मी महाराष्ट्राची लेक-सून असल्याचा मला अभिमान वाटतो. आता सत्कार करण्यापेक्षा मी केलेल्या समाजकार्याचा वसा घ्यावा, असे भाविक आवाहन त्यांनी केले. संचालन संदीप चिचाटे तर मनीष बोपटे यांनी आभार मानले.