अवैध वृक्ष कत्तल करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा
By admin | Published: July 12, 2017 02:12 AM2017-07-12T02:12:49+5:302017-07-12T02:12:49+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विकासाच्या नावाखाली तळेगाव-आष्टी व खडकी-किन्हाळा-अंतोरा
वृक्षप्रेमींची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विकासाच्या नावाखाली तळेगाव-आष्टी व खडकी-किन्हाळा-अंतोरा मार्गावरील बाभळीच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. इतकेच नव्हे तर अवैध पद्धतीने तोडण्यात आलेल्या वृक्षांची परस्पर विक्रीही करण्यात आल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वृक्षप्रेमींच्यावतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी पावसाळ्याचे कारण पुढे करीत काही लोकांना हाताशी धरून अवैधपणे मोठ्या प्रमाणात बाभळीची मोठाली वृक्ष तोडली. सर्वत्र वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन विषयावर जागर केल्या जात असताना इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने तब्बल १०२ वृक्ष अवैधपणे तोडण्यात आली. तोडण्यात आलेल्या या वृक्षाची किंमत ३ लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, केवळ तीन हजार रुपये भरण्यात आल्याचे वास्तव आहे. राज्यात एक ते सात जुलै दरम्यान वन महोत्सव राबवून ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या महोत्सवादरम्यान वृक्षांचे महत्त्व नागरिकांना सांगण्यात आले. परंतु, शासकीय अधिकाऱ्याच्यावतीने विकासाच्या नावाखाली मनमर्जी कारभार करून अवैध पणे वृक्ष तोडण्याचा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची उच्च स्तरीय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पाठविलेल्या निवेदनातून अंतोरा येथील राजेश ठाकरे यांनी केली आहे.