‘ती’ वास्तू पाडणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा
By admin | Published: July 26, 2016 01:50 AM2016-07-26T01:50:17+5:302016-07-26T01:50:17+5:30
भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून देशात दलितांवर अन्याय वाढले आहे.
बसपाचे राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन
पुलगाव : भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून देशात दलितांवर अन्याय वाढले आहे. मोठी स्वप्ने दाखवून भाजपा सत्तेवर आली व दलितांसाठी काम करणे सोडून अन्याय सुरू केले. मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यात आले. नगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुजरात येथे दलित युवकावर अत्याचार या प्रकरणांतील आरोपींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी बसपाने केली. याबाबत रविवारी मोर्चा काढून राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील बुद्ध भुषण प्रेसमधून डॉ. आंबेडकरांनी दलित, शोषित, बहुजनांना जागविण्यासाठी मुक नायक, जनता, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत यासारखे वृत्तपत्र प्रकाशित केले. त्या भवनाला भाजपाने रत्नाकर गायकवाड यांना हाताशी धरून मध्यरात्रीच्या सुमारास धराशाही केले. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्डी गावातील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाला. गुजरात येथील उन्स गावातील दलित युवकांना अर्धनग्न करून पोलीस प्रशासनाच्या समोर बेदम मारण्यात आले. भारतातील बहुजन समाजाचे एकमेव राष्ट्रीय नेतृत्व बहन मायावती यांच्यावर भाजप उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी अश्लिल टिप्पणी केली, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला. या सर्व प्रकरणांतील आरोपींवर कठोर कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी मोर्चा काढून राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी बसपा जिल्हा उपाध्यक्ष कुंदन जांभुळकर, सचिव राजू लोहकरे, विनोद बोरकर, प्रविण हावरे, अमोल घांगळे यांनी दोषींवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.(तालुका प्रतिनिधी)