महात्मा गांधींचे आदीनिवास टाकतेय कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:46 AM2018-05-09T00:46:19+5:302018-05-09T00:46:19+5:30
येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील ऐतिहासिक आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी ज्या प्रथम निवासस्थानात राहिले, ते निवासस्थान आदिनिवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्या निवासाला आज ८२ वर्षे पूर्ण झालीत. या काळात त्याचे छत झुकल्याने त्याची दुरूस्ती आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे. ही दुरूस्ती करताना मुख्य इमारतीत कुठलाही फरक पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.
आश्रमाला बरेच वर्ष झाले असून येथील प्रत्येक इमारत माती, कुड, बल्ली, बांबू, बोरे, कवेलू आदि स्थानिक साहित्याच्या माध्यमातून बनविण्यात आले आहे. यामुळे त्या वास्तुची वर्षाला ऋतू बदलताच सुरक्षा करावी लागते. सध्या परिसरात माकडांचा हैदोस वाढल्याने या छाताची दैनावस्था झाली आहे. शिवाय या दिवसात छतावरील कवेलू फेरावे लागतात.
आश्रमातील या पहिल्या कुटीचा मागचा भाग वाकल्याने त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. कुटी राष्ट्रीय स्मारक असल्याने त्यांच्या जतन व संरक्षणाच्या दृष्टीने बल्ली व बांबूवर विशेष प्रक्रिया करण्यात येत आहे. बांबू मोरचूद, गोमुत्र, निंबोळी अर्क इत्यादीच्या मिश्रणात ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांचा योग्य प्रकारे उपयोग करून मागील भाग तशाचा तसा नव्याने बनविण्यात येत आहे. ही दुरूस्ती २० ते २५ वर्षानंतर होत असल्याची माहिती अधीक्षक भावेष चव्हाण यांनी दिली. लवकरच नव्याने मागचा भाग तयार होवून दर्शनार्थी पाहू शकेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या हे काम जोरात असून ते लवकरच पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
१०० रुपयांत तयार झाले होते आदिनिवास
१९३६ मध्ये गांधजींनी शेगावमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. जमनालाल बजाज यांच्या मालकीच्या शेतातील जांबाच्या बागेत अस्थाई झोपडी करून गांधीजी सहकाऱ्यांसोबत राहिले. चार-पाच दिवसानंतर ते चरखा यात्रेसाठी निघाले. या ठिकाणी राहण्याच्या निर्णय झाल्यानंतर प्रथम कुटी बनविण्यासाठी काही अटी मीराबहन, बलवंतसिंग, मन्नालाल शहा यांनी समोर ठेवल्या. यात स्थानिक संसाधन कारागिर व १०० रुपयांपेक्षा अधिक खर्च नको, असे सुद्धा सांगितले. बापू चरखा यात्रेला गेल्यानंतर प्रथम निवासस्थानच्या कामाला सुरूवात झाली. १६ जून १९३६ मध्ये बापू परत शेगावला आल्यानंतर याच कुटीमध्ये ते कस्तुरबा आणि अन्य सहकाºयांसोबत राहिले. १९४२ च्या ठरावाची बैठक सुद्धा याच कुटीत झाली होती.