टाकळीत गुरूदेव भक्त शेतकरी आरक्षणासाठी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:06 PM2018-09-10T22:06:22+5:302018-09-10T22:06:41+5:30
गुरुदेव सेवा मंडळाच्या आग्रहावरून शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव पारित करण्यासाठीची टाकळीची ग्रामसभा ग्रामपंचायती ऐवजी गुरूदेव सेवा मंडळात आयोजित करण्यात आली होती. शेतकरी आरक्षणाची माहिती देण्यासाठी शैलेश अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : गुरुदेव सेवा मंडळाच्या आग्रहावरून शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव पारित करण्यासाठीची टाकळीची ग्रामसभा ग्रामपंचायती ऐवजी गुरूदेव सेवा मंडळात आयोजित करण्यात आली होती. शेतकरी आरक्षणाची माहिती देण्यासाठी शैलेश अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते. स्वागतगीताने गावात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्याच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. ग्रामविकासाचे असेच उपाय शैलेश अग्रवाल यांनी शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावातून देशाला सुचविलेले आहेत, यामाध्यमातून ते राष्ट्रसंतांच्या विचारांवरच कार्य करीत असल्याचे मत गुरुदेव सेवा मंडळाचे रूपराव खैरकार यांनी मांडले.
शासनाने या प्रस्तावावर अंमलबजावणी करावी यासाठी टाकळी ग्रामसभा या ठरावाच्या माध्यमातून मागणी करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांनी सांगीतले. ग्राम पंचायत सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला व सर्व ग्रामस्थांच्या एकमताने ठरावास मंजूरी देण्यात आली.
यावेळी बाबाराव सावरकर, विलास दरणे, प्रदीप खैरकार, प्रशांत घुमे, गजानन सावरकर व भारत एकोणकार यांनी शेतकरी आरक्षणाच्या उपयोगितेवर विचार व्यक्त केले व गावोगावी याविषयी गुरूदेव सेवा मंडळ प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.