तळेगाव, गिरड येथे पाणीटंचाईच्या झळा
By Admin | Published: April 4, 2016 05:15 AM2016-04-04T05:15:19+5:302016-04-04T05:15:19+5:30
वाढत्या उन्हामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी सर्वत्र पाणीटंचाई डोके वर काढत आहे.
वर्धा : वाढत्या उन्हामुळे जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी सर्वत्र पाणीटंचाई डोके वर काढत आहे. तळेगाव (टालाटुले) या १० हजार लोकसंख्येच्या गावात दोन नळयोजनेच्या विहिरी, दोन जलकुंभ, खासगी विहिरी, सार्वजनिक विहिरी, हातपंप आहे. असे असताना ग्रामपंचायतीच्या अनागोंदीमुळे येथे गत दोन वर्षांपासून गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गिरड येथे नळयोजनेच्या विहिरीने गाठलेला तळ व भारनियमनाच्या फटक्याने गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याकरिता नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गावातील ही समस्या सोडविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात येत असल्या तरी येथे त्या थिट्या पडत असल्याचे दिसून आले आहे.
तळेगाव (टालाटुले) : येथील पाणीटंचाई मार्गी काढण्याकरिता राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. सदर कायम पूर्णत्त्वास नेण्याकरिता प्रयत्न सुरू आहे. काम सुरू होवून सहा महिन्याचा कालावधी होत असला तरी काम पुर्णत्त्वास गेले आहे. यामुळे गावकऱ्यांची तहाण आता कंत्राटदारावरच अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
अडीच वर्षांपूर्वी गावातील पाणी टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतने शासनस्तरावर पाठपुरावा करून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत १.६६ लाख रुपयांची योजना मंजूर करून आणली. येथे मात्र या योजनेचे श्रेय लाटण्यावरून लोकप्रतिनिधींमध्येच रस्सीखेच झाल्याने ती तब्बल दोन वर्ष खोेळंबली. अखेर सहा महिन्यापूर्वी या योजनेचा मुहूर्त झाला. गावापासून ११ कि़मी. अंतरावर निमसडा बंधाऱ्याजवळ योजनेची विहीर खोदण्यात आली. येथे पाणीही मुबलक लागले आहे. ते गावकऱ्यांना पोहोचविण्याकरिता खोदकाम करून पाईप टाकणे सुरू आहे. जलकुंभाचेही काम अंतिम टप्प्यात आहे. गावात एक लाख लीटर व चाळीस हजार लीटर क्षमतेचे दोन जलकुंभ अगोदरच आहे. नव्याने ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होईल असे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. दोन वर्षे ही योजना रखडल्याने ती पुर्णत्त्वास जाते अथवा पुन्हा रखडते याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे.(वार्ताहर)
श्रेय लाटण्यात अडकली योजना
४तळेगावात उन्हाळ्याच्या दिवसात जाणवत असलेली पाणीटंचाई दूर करण्याकरिता मंजूर योजनेला मूर्तस्वरूप येण्यापूर्वीच येथे श्रेय लाटण्यावरून वाद झाला होता. या वादात योजना पूर्णत्वास जाण्याकरिता अनेक अडचणी गेल्या. आता सहा महिन्यांपूर्वी योजनेच्या कामाला सुरुवात झाली.
गावात लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि प्रत्येक नळावर मिटर बसवण्यात येईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाचेल. तसेच प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.
- अतुल तिमांडे, सरपंच, तळेगाव (ग्रा.)
गिरडवासीयांना आठवड्यातून एकच दिवस पाणी
गिरड : येथे गत महिन्यापासून गावकऱ्यांना साप्ताहिक पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. १३ हजार लोकसंख्येच्या गावाला पाणी पुरवठ्याकरिता तीन कोटी रुपये खर्चून सिर्सी नाला प्रकल्पातून जलपूर्ती योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र तीन वर्षे उलटून ती पुर्णत्त्वास आली नाही. त्यामुळे यावर्षीही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गत आठ दिवसांपासून पाच वॉर्डापैकी एकाही वॉर्डात पाणी पुरवठा झाला नाही. शिवाय पाणी वितरण करणारी पाईपलाईन नादुरूस्त झाली असहे. ती दुरूस्त होईपर्यंत आणखी दोन तीन दिवस गावकऱ्यांना पाणी मिळेल अथवा नाही, हे सांगणे कठीण आहे.
गिरड येथे १९७१ साली पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. एक लाख हजार लीटर पाणी पुरविण्याची क्षमता या योजनेची आहे. मात्र जलपूर्ती करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने सीर्सी नाला प्रकल्पात फिल्टर प्लॉन्ट उभारण्यात आला. गावाची लोकसंख्या विचारात घेता रोजनिशी ३ लाख ५० हजार लीटर पाण्याची गरज आहे. या फिल्टर प्लॉन्टची चार लाख लीटरच्या जलसाठ्याची क्षमता आहे. भारनियमनामुळे दररोज दीड लाख लीटर पाण्याचे वितरण करण्यात येते. आठवड्यातून चार दिवस भारनियमन असल्याने जलकुंभ भरण्याकरिता अनके अडचणी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील सिर्सी नाला प्रकल्पातून येथे जलपूर्ती करण्यात येत असून विद्युत महामंडळाच्या कार्यालयाकडे गिरड ग्रामपंचायतीने भारनियमनमुक्त विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली आहे.(वार्ताहर)
नळयोजनेच्या पाण्याची पातळी कमी झाली असून गावात सिर्सी येथील नाल्यावरून पाणीपुरवठा होतो; परंतु तिथे थ्री फेज नसल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गावात पाणी पोहोचविण्याकरिता त्रास होत आहे. वीज पुरवठ्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतने वरिष्ठांकडे पाठविला आहे. पाणी पुरवठ्याची जुनी विहीर असल्याने गावातील दोन विहिरींचा अधिग्रहण प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
- संध्या कांबळे, सरपंच, गिरड