दिवाळीनिमित्त गावी परतलेल्या जवानाच्या घरावर हल्ला; गावगुंडाच्या विरोधात तळेगावात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 06:02 PM2022-10-26T18:02:37+5:302022-10-26T18:03:27+5:30
पोलीस ठाण्यावर धडक, कठोर कारवाईची मागणी
तळेगाव (श्या.पंत.) : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच विविध गुन्हे दाखल असलेल्या गावातीलच एका व्यक्तीने गैरकायद्याची मंडळी गोठा करून दिवाळीचे औचित्य साधून गावात परतलेल्या सीआरपीएफच्या जवानाच्या घरावर हातात तलवार व गावठी बॉम्ब घेऊन हल्ला चढविला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर या घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने शहरातील सुजाण नागरिकांनी एकत्र येत सकाळी १० वाजताच्या सुमारास थेट तळेगाव पोलीस स्टेशनवर धडक दिली.
देशसेवेला प्राधान्य आणि आपल्या कुटुंबाला दुय्यम स्थान देणाऱ्या जवानाच्या घरावर तलवार आणि गावठी बॉम्ब हातात घेऊन हल्ला चढविणे ही निंदनीय बाब असून, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलीस स्टेशनवर धडक देणाऱ्यांनी एकमुखाने केली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आल्यावर संतप्त जमावाने आपले आंदोलन मागे घेतले. एकूणच या घटनेमुळे गावात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तळेगावला आले होते पोलीस छावणीचे स्वरूप
सीआरपीएफचे जवान अमित अनिल घावडे यांच्या घरावर हल्ला चढविणाऱ्या मुख्य आरोपी अण्णा सिंग बादलसिग बावरी याला तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. असे असले तरी सकाळी पोलीस स्टेशनवर धडक देणाऱ्या संतप्त नागरिकांनी जोवर आरोपीला अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस कचेरीसमोर ठिय्या देऊ, असा पवित्रा घेतल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. माहिती मिळताच आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत साळुंके, आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत, आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांनी आपल्या चमूसह तातडीने तळेगाव गाठले. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळेगावात दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. एकूणच तगड्या बंदोबस्तामुळे तळेगावला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
अण्णा सिंग बावरी विरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल
आरोपी अण्णा सिंग बादलसिंग बावरी याच्याविरुद्ध सीआरपीएफचे जवान अमित अनिल घावडे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४४८,५०४,५०६,३४ तसेच हत्यार ॲक्टच्या ४, २५ अन्वये गुन्ह्याची नोंद घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे. असे असले तरी आरोपी अण्णासिंग बावरी याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्याविरुद्ध तडीपारीचीही कारवाई करण्यात आली होती असे पोलिसांनी सांगितले.
फटाके खरेदी दरम्यानचा वाद सोडविण्यासाठी जवानाने केली होती मध्यस्ती
जवान अमित घावडे हे सीआरपीएफ फोर्स सी-६० पथकात गडचिरोली येथे सेवा देत आहेत. आईची प्रकृती बरी नसल्याने ते १८ ऑक्टोबरला तळेगावात परतले. २४ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ते मित्र प्रितम लोखंडे यांच्या फटाक्याच्या दुकानात फटाके खरेदीसाठी गेले. तेव्हा मी जेवण करतो तू थोडा थांब असे म्हणत प्रितमने त्यांना दुकानात थांबविले. याच दरम्यान आरोपी अण्णासिंग बावरी हा तेथे आला. त्याने फटाक्याच्या पैशांवरून प्रितमशी वाद केला. हाच वाद सोडविण्यासाठी जवान अमित घावडे, इरफान खान, त्रिशुल भुयार आदींनी प्रयत्न केले. त्यानंतर अरेरावी करीत अण्णासिंग बावरी हा तेथून निघून गेला. पण मंगळवारी याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने काही गैरकायद्याची मंडळी गोळा करून हातात तलवार व गावठी बॉम्ब घेत जवानाच्या घरावर हल्ला चढविल्याचे सांगण्यात आले.