सेलू पंचायत समितीवर पुन्हा झाकली ताडपत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:48 PM2019-07-03T21:48:51+5:302019-07-03T21:49:10+5:30
कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याचा विकास झाल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे. असे असताना ६२ ग्राम पंचायतचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर यंदा पुन्हा पावसाळ्यात ताडपत्री झाकण्याचे काम सुरू झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्याचा विकास झाल्याचा गवगवा लोकप्रतिनिधी करीत आहे. असे असताना ६२ ग्राम पंचायतचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाच्या छतावर यंदा पुन्हा पावसाळ्यात ताडपत्री झाकण्याचे काम सुरू झाले आहे. ६२ ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गावाच्या विकासाच्या योजनेची अंमलबजावणी करणारे कार्यालय म्हणून असलेल्या पंचायत समितीवर जबाबदारी आहे. या जीर्ण झालेल्या इमारतीतून गाव विकासाचे निर्णय घेणारे लोक प्रतिनिधी दर मासिक सभेला येतात. या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा आहे. एका गावासाठी कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगणारे लोकप्रतिनिधींचे या इमारतीकडे दुर्लक्ष करून आहेत.
गत काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की या इमारतीच्या छतावर ताडपत्री झाकली नाही तर इमारतीत असणारे महागडे उपकरणे भिजल्या शिवाय राहत नाही. गळती लागणारे कार्यालय म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे गत चार दिवसांपासून सुरू असलेला पाऊस पाहता बुधवारी या कार्यालयावर ताडपत्री टाकण्याचे काम सुरू आहे . दरवर्षी ताडपत्री टाकली जात असली तरी या इमारतीच्या भिंती जीर्ण झाल्या असून याला भेगा गेल्या आहे जीव मुठीत घेऊन कर्मचारी आपले कामकाज उरकवित आहे. जीर्ण इमारतीऐवजी किरायाच्या इमारतीतून कार्यालय चालविण्याची वेळ काही दिवसात येणार आहे.