अनुदानाच्या रकमेतून कर्र्जाची कपात
By admin | Published: May 12, 2016 02:27 AM2016-05-12T02:27:42+5:302016-05-12T02:27:42+5:30
शासकीय अनुदानातून कर्जाची कपात करू नये असे शासन निर्देश आहे.
आकोली : शासकीय अनुदानातून कर्जाची कपात करू नये असे शासन निर्देश आहे. असे असतानीही सुकळी (बाई) येथील बॅँक आॅफ इंडियाचे कर्मचारी निराधारांच्या मदत राशीतून व घरकुलकरिता मिळालेल्या अनुदानातून कधीकाळी उचललेल्या कर्जाची कपात करीत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.
अनेक गरजू नागरिकांसाठी निराधार योजना ही आधार ठरत आहे. ग्राहकांना गरजेनुसार कधीकाळी कर्ज घ्यावे लागते. पण त्यांच्या कर्जाची थकित रक्कम त्यांना मिळत असलेल्या अनुदानातून बँकेत जमा केली जात आहे. लाभार्थ्यांचे विड्रॉल फॉर्म भरून पासबुक देताच बॅँकेचा कर्मचारी स्वहस्ताक्षरात पैसे जमा करण्याची स्लिप भरतो व लाभार्थ्यांच्या हाती पासबूक थोपवून त्याला घराचा रस्ता दाखवत असल्याचे प्रकार घडत आहे.
भाऊराव यशवंत इंगोले रा. मदना या निराधार लाभार्थ्याला दिवाळीपासून रोख रक्कमच देण्यात आली नाही. त्यांनी बँकेतून यापूर्वी कर्ज घेतले होते. त्यामुळे प्रत्येकवेळी पैसे जमा करण्याची पावती भरून अनुदान कर्जात कपात करण्यात आल्याने त्यांना एक रुपयाही मिळाला नाही.
त्याचप्रकारे सुकळी (बाई) येथील वासुदेव गळाके यांना प्रतीक्षा यादीप्रमाणे शासनाने घरकूल मंजूर केले. रोजमजुरी करणाऱ्या वासुदेवने नातेवाईकांकडून उसणवार घेवून बांधकाम सुरू केले. पहिला हप्ता बॅँकेत जमा होताच ५ हजारांची व दुसरा हप्ता जमा होताच ८ हजार रूपयांची कपात करण्यात आली. त्यांनी पंक्चर दुरूस्तीच्या दुकानासाठी १२ हजाराचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड बँकेने या रकमेतून परस्पर करून घेतली. त्यामुळे आता अर्धवट घर कसे बांधावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेवून न्याय देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)