शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडविणारा शिल्पकार!
By admin | Published: April 24, 2017 12:27 AM2017-04-24T00:27:53+5:302017-04-24T00:27:53+5:30
शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडविणारा शिल्पकार होय, असे प्रतिपादन दिल्ली येथील कौशल्य विकास अधिकारी संदिपसिंग यांनी केले.
"टीचर ईन यू" या विषयावर शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा
तळेगाव (श्या.पं.) : शिक्षक म्हणजे विद्यार्थी घडविणारा शिल्पकार होय, असे प्रतिपादन दिल्ली येथील कौशल्य विकास अधिकारी संदिपसिंग यांनी केले. येथील मॉडेल हायस्कूल मध्ये आयोजित "टीचर ईन यू" या शिक्षकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
रायसोनी कॅरिअर फॉऊंडेशन व ग्लोबल एज्यूकेशन फॉऊंनडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल हायस्कूलच्या शिक्षकांसाठी कार्यशाला आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विलास वानखडे तर प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षक शरद वाळके व रायसोनी ग्रृपच्या समन्वयक प्रा भाग्यश्री पालेवार होते. मुख्याध्यापक विलास वानखडे रचित "काव्यमय पाढ्यातून मुल्यशिक्षण" हे पुस्तक मार्गदर्शक संदिपसिंग व भाग्यश्री पालेवार यांना भेट देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी "गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वसा" हे गीत संगीत शिक्षक हरिष तांबोली यांनी सादर केले. शालेय अध्यापन करतांना बदलत्या काळानुसार आव्हान स्विकारणारा, नवनवीन तंत्रज्ञानाचा स्विकार करणारा शिक्षकच स्पर्धेत टिकू शकेल व येणारी विद्यार्थी पिढी बदलते आव्हान सक्षमपणे स्विकारू शकणारी घडवेल असे मौलीक विचार भाग्यश्री पालेवार यांनी मांडले. पॉवर पॉईट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून संदिपसिंग यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधून शिक्षकांच्या कार्याची व भुमिकेची जाणीव करून दिली. खरा भारत हा ग्रामीण भागात असल्याचे सांगण्यात येते. अनेक थोर संत, महात्मे, शिक्षणतज्ञ ग्रामीण भागातून पुढे आल्याचे दिसून येते. असे असले तरी आज प्रत्येकाची धाव शहराकडे आहे असे संदिपसिंग यांनी सांगीतले. कठीण गोष्टीला सोपे करून सांगणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य आहे. विषयाचे ज्ञान ठेवणे, जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यामध्ये निर्माण करणे, योग्य संवाद साधणे, प्रगतीचा मागोवा घेणे, नेतृत्व कौशल्य स्वतासोबत विद्यार्थ्यात निर्माण करणे, अध्यापनपूर्व तयारी करणे, विद्यार्थ्यांना उपक्रमशिल बनविणे, विद्यार्थ्यामधील बदल दबावाने नाहीतर प्रभावाने घडून येत असतो याची जाणीव ठेऊन कार्य करणारा व आव्हान स्विकारीत अध्यापनात नवनविन बदल घडविणारा शिक्षक विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शक ठरू शकतो, शिक्षक हा खरा शिल्पकार असून ज्ञानाचा निमार्ता ठरतो असे मौलीक विचार संदिपसिंग यांनी मांडले. या प्रसंगी ज्योती कडू, विनोद बन्सोड, शरद कडू,रामदास मडावी यांनी कार्यशाळेबद्दल मनोगत व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी राष्ट्पती ए. पी. जे.अब्दुल कलाम, नारायण मुर्ती यांचे शैक्षणिक विचार असलेले चित्र भाग्यश्री पालेवार यांनी शाळेसाठी भेट दिले व उपस्थित शिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान केले. संचलन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हरिष तांबोली यांनी केले.(वार्ताहर)