शाळेला कुलूप ठोकताच तासाभरात मिळाला शिक्षक
By admin | Published: June 28, 2016 01:50 AM2016-06-28T01:50:18+5:302016-06-28T01:50:18+5:30
शाळेच्या पहिल्या दिवशी धामकुंड येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्याने चांगलीच
कारंजा (घाडगे) : शाळेच्या पहिल्या दिवशी धामकुंड येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्याने चांगलीच खळबळ माजली. या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने तात्काळ एका तासात शाळेकरिता शिक्षकाची व्यवस्था केली. गत वर्षापासून सुरू असलेली गावकऱ्यांची मागणी या आंदोलनाने पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनीही शिक्षक शाळेत दाखल होताच कुलूप उघडले.
कारंजा तालुक्यातील धामकुंड येथील जि.प. प्राथमिक शाळेत पटसंख्येनुसार मागील एक वर्षापासून एक शिक्षक कमी होता. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा मागणी करूनही दिला नाही. यामुळे शाळाव्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २७ जूनला शिक्षक दिला नाही तर शाळेला कुलूप ठोकू, असा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार आज सकाळी १० वाजता शाळेला कुलूप लावण्यात आले.
याची माहिती गटशिक्षणाधिकारी धनंजय उमेकर यांना मिळताच त्यांनी गावकऱ्यांचा रोष शांत करण्याकरिता शाळेला तात्पूरता एक शिक्षक दिला. शिक्षक मिळताच गावकऱ्यांनी शिक्षण विभागाचे आभार मानत ११ वाजता कुलूप काढले. नियमित शिक्षक जि.प. कडून प्राप्त होईपर्यंत हा समायोजित शिक्षक या शाळेत काम करणार आहे. जि.प. सदस्य गोपाल कालोकर व गटशिक्षणाधिकारी उमेकर यांच्या मध्यस्तीने प्रकरण तात्पुरते क्षमले; मात्र शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. यावर शिक्षण विभागाच्या भूमिकडे साऱ्यांचे लक्ष आहे.(तालुका प्रतिनिधी)