संस्थाध्यक्षांची शिक्षकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:43 AM2018-09-03T00:43:01+5:302018-09-03T00:43:46+5:30
येथील बाबुराव बांगडे विद्यालयाचे अध्यक्ष श्रीकांत बांगडे यांनी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांना मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : येथील बाबुराव बांगडे विद्यालयाचे अध्यक्ष श्रीकांत बांगडे यांनी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांना मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी २ वाजताचे सुमारास घडली. या प्रकरणी शिक्षक परमेश्वर केंद्रे यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
रविवार २ सप्टेंबर रोजी संस्थेचे दिवंगत अध्यक्ष शांताराम बांगडे व बाबुराव बांगडे या बंधुंचा स्मृतीदिनाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा सकाळी १२ वाजतापर्यंत उत्साहात पार पडला. नंतर शिक्षक व अध्यक्ष एकत्र बसले. याप्रसंगी केंद्रे यांनी त्यांच्या पदवीची नोंद घेण्यासंदर्भात संस्थाध्यक्ष बांगडे यांना विनंती केली. केंद्रे हे बारावी डि.एड. असताना एस.बी.सी. या राखीव जागेवर म्हणून शिक्षक म्हणून रूजू झाले होते. नंतर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. सदर नोंद घेण्यासंदर्भात त्यांनी वारंवार मुख्याध्यापकांना लेखी विनंती केली होती. मात्र, नोंद न घेतल्यामुळे शिक्षणाधिकारी वर्धा यांना तक्रार देण्यात आली. यामुळे मुख्याध्यापकांचे पगार थांबविण्यात आल्याचा राग अध्यक्षांचा मनात होताच. याच कारणावरून वाद करून ‘थांब तुला दाखवितो’ असे म्हणत याप्रसंगी वाद करण्यात आला. इतक्यावरच संस्थाध्यक्ष थांबले नाही तर त्यांनी भाजी कापण्याच्या चाकूने आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप तक्रारीतून केंद्र यांनी केला आहे.
संस्थाअध्यक्ष कुठल्याही कारणावरून नेहमीच त्रास देतात. शिवाय सुट्टीच्या दिवशीही कामावर बोलावतात. सुट्यामंजूर न करणे, विद्यार्थ्यांसमोर दमदाटी करणे आदी प्रकार यापूर्वी संस्थाध्यक्षांनी केल्याचेही तक्रारीत नमुद असल्याचे सांगण्यात आले. संस्थाध्यक्षांनी केलेल्या मारहाणीत शिक्षक केंद्रे जखमी झाले असून त्यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर भादंविच्या ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अध्यक्षांना माझी बी.ए.ची नोंद करून घ्या अशी विनंती केली असता त्यांनी नकार दिला. तसेच मला मारहाण करायला सुरूवात केली. त्याच दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी बांगडे म्हणाल्या की, अध्यक्ष माझा भाऊ आहे. त्यांना काही विचारणा करशील तर मी महिला असल्यामुळे तु मला छेडखान केल्याच्या गुन्ह्यात अडकवेल, असे म्हणत तंबी दिली.
- परमेश्वर केंद्रे, शिक्षक, बा.बा. विद्यालय, पवनार.
कार्यक्रम संपल्यानंतर मी दामोधर राऊत व शिक्षक आॅफीसमध्ये चर्चा करीत असताना केंद्रे माझेकडे आले. त्यावेळी त्यांनी मला तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगितले. मी त्याला आज नको उद्या बोलू असे म्हटले; पण त्यानी एैकले नाही. म्हणून मी उठून बाहेर जायला लागलो असता त्यानी मला दरवाजात गाठून धकलले. त्यामुळे मी खाली पडलो असता त्याने मला तोंडावर लात मारली. राऊत मध्ये पडले असता त्यांनाही धक्का देवून खाली पाडले. त्यानंतर सर्व शिक्षक धावले. त्यांच झटापटीत केंद्रे यांना लागले. आपण मारहाण केली नाही. उलट केंद्रेनीच मला बघून घेतो अशी धमकी दिली.
- श्रीकांत बांगडे, बा.बा.वि.पवनार.