शिक्षक हा चौफेर दृष्टी असलेला असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:23 PM2019-01-31T21:23:43+5:302019-01-31T21:24:11+5:30
शिक्षक ही सर्वव्यापी दृष्टी असलेली व्यक्ती असली पाहिजे. त्याला जगातील सर्व विषयांचे ज्ञान अवगत असावे. शिक्षक ही विद्यार्थ्यांपासून समाजाच्या सर्व घटकांचे समाधान करू शकेल, असे उत्तर देण्याच्या ताकदीची व्यक्ती असली पाहिजे, अशी अपेक्षा लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शिक्षक ही सर्वव्यापी दृष्टी असलेली व्यक्ती असली पाहिजे. त्याला जगातील सर्व विषयांचे ज्ञान अवगत असावे. शिक्षक ही विद्यार्थ्यांपासून समाजाच्या सर्व घटकांचे समाधान करू शकेल, असे उत्तर देण्याच्या ताकदीची व्यक्ती असली पाहिजे, अशी अपेक्षा लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवाग्राम आश्रममधील नई तालीम शाळेला त्यांनी बुधवारी भेट दिली. येथील शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला. सुषमा शर्मा, अतुल शर्मा यांनी द्वादशीवार यांचे स्वागत केले. यावेळी शाळेतील सर्व परिसराची पाहणी केली. मुलांनी काढलेले तैलचित्र पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, ज्ञानाची सीमा मर्यादित राहू नये, विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक उत्सुकता असते. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विधायक पद्धतीने देता आली पाहिजे. त्यासाठी शिक्षक परिपूर्ण असावा, समाजाला चांगली बाजू सांगतानाच ती समाजामध्ये रूजविण्याची ताकद शिक्षकांमध्ये असावी, असेही त्यांनी सांगितले. जवाहरलाल नेहरू हे विज्ञानाचे विद्यार्थी होते. परंतु, त्यांनी जगाचा इतिहास लिहिला. आपल्याला जे येत नाही, ते मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शाळेच्या प्रमुख सुषमा शर्मा यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना द्वादशीवार यांनी समर्पक उत्तरे देऊन गांधींनंतरही या शाळेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.