भावी शिक्षकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 03:02 PM2021-10-29T15:02:13+5:302021-10-29T15:06:50+5:30
महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी २०१२ नंतर, डिसेंबर २०१७ मध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली, तरी अद्यापही शिक्षक पवित्र पोर्टलची प्रकिया अजूनही पूर्ण झाली नाही.
वर्धा : सध्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात शिक्षकांची हजारो पदे राज्याच्या शिक्षण विभागात रिक्त असून, नवीन भरती प्रकिया राबविण्याच्या प्रकियेतच मोठा सावळा गोंधळ दिसून येत आहे. त्यामुळे याचा देशाची भावीपिढी घडविणाऱ्या शिक्षकावर मोठा दूरगामी परिणाम होत आहे.
केवळ पारदर्शकतेच्या तथाकथित नावाखाली एकाच भरती प्रक्रियेला चार-पाच वर्षे लागत असल्याने साप्रंत स्थितीत डी.एड-बी.एड बेरोजगारांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेबद्दल भावी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पवित्र पोर्टलची प्रकिया फारच कासवछाप मंद गतीने सुरू असल्याने भावी काळात शिक्षक होण्याचे स्वप्न केवळ दिवास्वप्नच राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी २०१२ नंतर, डिसेंबर २०१७ मध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली, तरी अद्यापही शिक्षक पवित्र पोर्टलची प्रकिया अजूनही पूर्ण झाली नाही. ही शैक्षणिक दृष्ट्या मोठी शोकांतिका आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या युतीच्या काळात सुरू झालेली ही प्रक्रिया माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि आता विद्यमान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या पर्यंत पोहोचली आहे. राज्यात युतीचे सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आले, तरी शिक्षक भरतीचा पवित्र पोर्टलचा खेळ थांबणार तर नाही का? अशी भीती भावी शिक्षकांकडून व्यक्त होत आहे. तत्कालीन युतीच्या सरकारने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले होते.
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, शिक्षक भरतीत भ्रष्टाचार व सावळा गोंधळ होऊ नये, आधुनिक काळात शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षक शाळांना मिळावेत, यासाठी शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा दूरगामी निर्णय त्यावेळच्या तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २०१७ साली घेतला, आतापर्यंत या शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर एक लाख तेवीस हजारापेक्षा बेरोजगार उमेदवारांनी नोंदी केलेल्या आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, माध्यमिक व प्राथमिक शाळांनी पोर्टलवर विविध प्रकारच्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहे. पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षकांची राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय गुणवत्तेनुसार शिक्षकांची निवड करण्यासाठी होकार दर्शविला होता. अर्थातच, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळासाठी मेरीटनुसार नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु महाराष्ट्र शासनाने भावी शिक्षकांच्या संयमाचा बांध न तुटू देता, शिक्षकांच्या भरत्या तातडीने करणे गरजेचे आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रचंड बेरोजगारी वाढली असून, शिक्षणाचा अनुशेष महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शासनाने बेरोजगारी दूर करण्यासाठी शिक्षक पोर्टल त्वरित सुरू करून, शिक्षक भरती करून भावी शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, त्यांना नियुक्तिपत्रे देऊन रिक्त जागेवर त्यांची नियुक्ती करावी.
अरुण कहारे, शिक्षक, आर्वी.
२०१२ पासून शिक्षक भरती प्रकिया थांबलेली आहे, ती महाराष्ट्र शासनाने सुरू करून बेरोजगार शिक्षकांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. कारण, अनेक शिक्षकांचे वय वाढत असल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याचा ठपका लागू नये म्हणून आगामी काळात शिक्षकांची भरती या पैशाने न करता गुणवत्ता हेरून करणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिक्षक पवित्र पोर्टल सुरू करून बेरोजगार उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा, असे मला वाटते.
प्रा. विजय वानखेडे, आर्वी.