शिक्षकांचे वेतन थेट खात्यात जमा होणार
By Admin | Published: May 31, 2015 01:32 AM2015-05-31T01:32:09+5:302015-05-31T01:32:09+5:30
जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक च उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यात जमा करण्याचे ...
जूनच्या देयकात माहिती सादर करण्याचे आदेश
वर्धा : जिल्ह्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक च उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यात जमा करण्याचे प्रस्तावित असल्यामुळे सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जूनच्या वेतन देयकासोबत माहिती सादर करण्याचे आदेश वेतन पथक कार्यालयाने दिले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणे वेतन दिल्या जात आहे, त्याच धर्तीवर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन थेट खात्यात जमा करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या विलंबाने होणाऱ्या वेतनाच्या तक्रारीवर लगाम लावता येणार आहे. शिक्षण विभागाच्या २८ मे रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समधील सूचनेनुसार सर्व अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापासूनचे वेतन सीएमपी द्वारे थेट खात्यामध्ये जमा करण्याचे प्रस्तावित आहे.
शाळांनी पुढील माहिती लॉगिन करून तपासावयाची आहे. चुकलेली माहिती दुरूस्त करून लेव्हल २ ला फॉरवर्ड करावी. तसेच जून महिन्याच्या देयकासोबत टीडीएसचा चौथा हप्ता, ध्वजनिधी भरल्याची पावती, खाते मान्यता व संच मान्यतेसह विहित मुदतीत माहिती सादर करावयाची आहे. सोबतच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव युडायस क्रमांक, संयुक्त खाते क्रमांक व बँकचे नाव, कपातीचा खाते क्रमांक, जन्मातरीख, वेतन खाते क्रमांक व बँकेचे नाव इत्यादी माहिती देणे आवश्यक आहे. (शहर प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र
शालार्थ प्रणालीमध्ये संपूर्ण माहितीची नोंद करून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना थेट खात्यात वेतन अदा करण्यास अडचण नसल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे. यात चूक झाल्यास सर्वस्वी जबाबदार मुख्याध्यापक राहील असे वेतन पथक अधीक्षक (माध्यमिक) यांनी दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यात जमा करण्याच्या या निर्णयाचे विमाशी संघाने स्वागत केले आहे.