विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांची वणवण भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:00 PM2018-06-13T22:00:26+5:302018-06-13T22:00:26+5:30
शाळा सुरू होण्यास थोडाच अवधी शिल्लक असताना पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतला आहे. शिक्षक विद्यार्थी आपल्या शाळांकडे आकर्षित करण्यात लागला आहे. यासाठी विविध प्रलोभने दिली जात असल्याचेही दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शाळा सुरू होण्यास थोडाच अवधी शिल्लक असताना पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतला आहे. शिक्षक विद्यार्थी आपल्या शाळांकडे आकर्षित करण्यात लागला आहे. यासाठी विविध प्रलोभने दिली जात असल्याचेही दिसून येत आहे.
खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी खासगी शाळांचे शिक्षक गट करून विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेला वेग देत आहेत. संस्थेतर्फे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात अनेकांनी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मोफत, घरून शाळेपर्यंत व शाळेतून घरापर्यंत पोहोचविण्यासाठी सेवाही पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय अन्य आकर्षक प्रलोभने दिली जात आहे. अनेकांची आॅफर स्वीकारून विद्यार्थी इकडल्या शाळेतून तिकडे, असा प्रकारही पाहायला मिळत आहे. यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांचा नामवंत शाळांकडे रांगा लागत आहेत तर अन्य शाळांना मात्र विद्यार्थ्यांसाठी वणवण फिरावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गणपूर्ती करण्यासाठी अनेक शिक्षक तर स्व-खर्चातून विद्यार्थ्यांना प्रलोभन देत आहेत. मराठी शाळांची विद्यार्थी संख्या दरवर्षी कमी होत असल्याने शाळा टिकविणे हे उद्दिष्ट संस्थांचे आहे. त्याचा अंतिम परिणाम हा शिक्षकांवर होत असल्याने आणि नोकरी तेथेच टिकावी या अपेक्षेने विद्यार्थी शोधमोहिम सुरू आहे. अनेकांनी आपले उद्दिष्ट साध्य केले असले तरी लहान शाळांत अद्यापही विद्यार्थ्यांची वाणवाच दिसत आहे. उत्पन्न कमी असलेल्या पालकांचा गटही आता कॉन्व्हेंट संस्कृतीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत असल्याने पूढे मराठी शाळांचे भवितव्य काय, मराठीचे भवितव्य काय, असा प्रश्न उभा ठाकतोय. मराठीचा वाणवा आपल्या मराठी राज्यात जाणवत असला तरी विदेशात मात्र मराठी भाषेचे आकर्षण वाढत आहे. या विरोधाभासाचे विचित्र चित्र उमटत असल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या योजनेंतर्गत २५ टक्के राखीव जागेत प्रवेश मिळावे म्हणून अनेकांनी अर्ज केले; पण अद्याप अंतीम प्रवेश प्रक्रियेला गती आली नाही. यामुळे पालकांची चिंता वाढत आहे. अन्य संस्थांच्या शिक्षकांचा प्रवेशासाठी तगादा वाढतच आहे. नामवंत शाळेत पाल्याला प्रवेश मिळावा म्हणूनही धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मराठी वाचवा
दिवसेंदिवस मराठी शाळातील विद्यार्थी संख्या रोडावत चालल्याने शाळांची संख्याही घटतच आहे. ग्रामीण भागात जि.प. च्या शाळांना विद्यार्थीच नाहीत. शिक्षकांची कमतरता, इमारत आणि संसांधनांची कमी यामुळेच अधिकाधिक शाळा समस्येच्या गर्तेत सापडल्या आहेत. खासगी शिक्षण संस्थांची तत्परता आणि गतिशील नियोजन यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी त्या शाळांकडे वळत आहे. परिणामी, ग्रामीण शाळांत विद्यार्थी संख्यो रोडवली आहे. कशाबशा शाळा चालताहेत, हे वास्तव आहे. खासगी शाळांनाही पूरेशी विद्यार्थी संख्या मिळत नसल्याने नामवंत नसलेल्या शाळातील वर्ग तुटत असून अतिरिक्त शिक्षक या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हाच वेग कायम राहिल्यास मराठी शाळा बंद झाल्यास नवल नसावे. शासनाचे धोरण नेमके कुठल्या दिशेने जाते, हे स्पष्टच होत नसून मराठी वाचेल काय, मराठी भाषा, मराठी संस्कृतीची वाढ खुंटणार की काय, अशी ओरड होताना दिसून येत आहे.