शिक्षकांना सप्टेंबरच्या वेतनाची प्रतीक्षा
By admin | Published: October 12, 2014 11:47 PM2014-10-12T23:47:59+5:302014-10-12T23:47:59+5:30
पंचायत समिती प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वर्धा, सेलू आणि आर्वी पंचायत समिती मधील प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत झाले नाही. प्रशासनाच्या उदासीन व दिरंगाईचा
वर्धा : पंचायत समिती प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वर्धा, सेलू आणि आर्वी पंचायत समिती मधील प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्यापपर्यंत झाले नाही. प्रशासनाच्या उदासीन व दिरंगाईचा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने निषेध नोंदविण्यात येत असल्याचे निवेदनातून कळविले आहे.
शालार्थ वेतन प्रणाली लागू झाल्यापासून दरमहा वेतनास विलंब होत आहे. वेतन नियमित एक तारखेला होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनीही याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत; मात्र पंचायत समिती शिक्षण विभाग आणि लेखा विभागाच्या अडवणुकीमुळे अद्यापही शिक्षकांच्या वेतनास अनाकलनीय विलंब होत असल्याचा आरोप शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर यांनी निवेदनातून केला आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचे अनुदान आणि वित्तप्रेषण पंचायत समितीला गुरूवारी प्राप्त झाले. देवळी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समिती मधील शिक्षकांचे वेतन शुक्रवारी आणि शनिवारला करण्यात आले. मात्र वर्धा पंचायत समितीच्या लेखा विभागाच्या अडवणीमुळे, सेलू पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या सभा व्यस्ततेमुळे आणि आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रजेवर गेल्याने शिक्षकांचे वेतन झालेले नाही. वेळेवर देयके न करणे, लेखा विभागाने आक्षेप अगदी शेवटच्या क्षणी लावण्याची आपली परंपरा न सोडणे आणि अधिकाऱ्यांना आपल्या व्यस्ततेतून देयक आणि धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी सवड न काढणे या प्रकारातून शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचा आरोप शिक्षक समितीने निवेदनातून केला आहे. विधानसभा निवडणुकीकरिता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या असल्याने मंगळवार पासून सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होतील. वेतन खाती असणाऱ्या बँकातील अनेक कर्मचारी मायक्रो आॅब्झर्वर असल्याने ते सुद्धा बँकेत असणार नाही. यामुळे शिक्षकांचे वेतन पुन्हा तीन-चार दिवस होणार नसल्याची स्थिती आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत समितीला वेतनाच्या बाबतीत तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली. यावेळी नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर, महेंद्र भुते, अजय बोबडे, प्रकाश काळे, गुणवंत बाराहाते, सुनील भोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)