विद्यार्थ्यांचे अध्यापन मात्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:14 PM2018-02-09T23:14:57+5:302018-02-09T23:15:37+5:30
कमी पटसंख्यांच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला. त्यावर जिल्ह्यात अंमल करण्यात आला असून सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कमी पटसंख्यांच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला. त्यावर जिल्ह्यात अंमल करण्यात आला असून सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सुरू सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत त्या शाळा कागदावर बंद करण्यात आल्या आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मात्र गावातच धडे देत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषद सांगत आहे.
या शाळा बंद झाल्यास अर्ध्या सत्रातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे. शिवाय मध्येच कोणत्या शाळेत त्यांचे समायेजन करावे असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वर्तविण्यात आला होता. यावर जिल्हा परिषदेच्या सभासदांच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष नितीन मडावी, शिक्षण सभापती जयश्री गफाट व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी या शाळा विद्यार्थ्यांकरिता कागदोपत्री बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड वपडणार नाही, हे मात्र तितकेच खरे.
कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील एकूण २८ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर जिल्ह्यात कारवाई सुरू झाली आहे. प्रारंभी सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पण शाळा बंद करताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यामुळे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
उर्वरीत शाळा नव्या शैक्षणिक सत्रात बंद करण्यात येणार आहेत. यातील विद्यार्थ्यांचे समायोजन लगतच्या शाळेत करण्यात येणार आहे. पण या शाळेत हे विद्यार्थी जाणार कसे याचा विचार शासनाच्यावतीने करण्यात आला नाही. वर्धा जिल्हा परिषदेने घेण्यात आलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, यात दुमत नाही. पण हा निर्णय सत्र संपेर्यंत आहे. यानंतर या विद्यार्थ्यांना ज्या शाळेत पाठविण्यात येईल त्या शाळेत त्यांना कसे पाठवावे असा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
सत्र समाप्तीनंतर काय
सुरू सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत जिल्हा परिषदेने या शाळा कागदावर बंद केल्या आहेत. पण नवे सत्र सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे काय, याचा विचार आताच होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे समायोजन झाल्यानंतर त्यांच्यावर प्रवासाचा भुर्दंड बसणार नाही याची दक्षात जि.प प्रशासनाने घ्याची अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता मध्येच शाळा बंद केल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे शाळा कागदावर बंद करून विद्यार्थ्यांना त्याच शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या सत्रात विद्यार्थ्यांचे समायोजन करताना त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शिवाय बंद होणार असलेल्या शाळा तशाच सुरू राहील या संदर्भात शासनाला मागणी करण्यात येणार आहे.
- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद वर्धा.