‘अॅट्रॉसिटी’च्या तांत्रिक गुन्ह्यांनी वाढविली पोलिसांची डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 04:03 PM2021-09-30T16:03:29+5:302021-09-30T16:06:32+5:30
काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे. मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत.
वर्धा : वैयक्तिक हेवेदावे, भांडण किंवा राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी जिल्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हाेत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले, तरी तक्रारदाराच्या विरोधातच चोरी, दरोडेखोरीचे गुन्हे दाखल करून त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हेही वास्तव आहे. मात्र, काही ठराविकांकडून होत असलेल्या कायद्याच्या गैरवापरामुळे अॅट्रॉसिटीच्या तांत्रिक तक्रारीही वाढल्याचे चित्र आहे.
मागील आठ महिन्यात जिल्ह्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत २८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात किरकोळ वादातून अथवा राजकीय वादातून दाखल झालेल्या तांत्रिक स्वरुपाच्या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जातीय मानसिकतेतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आणला गेला. मात्र, आजही हे अन्याय, अत्याचार होत आहेत हे देखील वास्तव आहे.
जातिव्यवस्था या वर्गावर अन्याय करीत असली आणि अॅट्रॉसिटी कायदा दुर्बलांचे संरक्षण करीत असला तरी हा कायदाच आता आमच्यावर अन्याय करीत असल्याच्या भावनाही अधिक तीव्र होत आहेत. समाज बदलत आहे. आपापल्या जातीचे अस्तित्व, अस्मिता जपत एकमेकांपासून अलग राहणारे समाजसमूह आता जवळ येऊ लागले आहेत. शिक्षण, नोकऱ्या, उद्योग, व्यवसाय, कला संस्कृतीतून सहजीवनाचे एक नवीन पर्व सुरू झाले. शिक्षण वा नोकरीच्या निमित्ताने दररोज एकत्र बसणे, उठणे, खाणेपिणे, काम करणे होत असते. परंतु, हे चाललेले असताना अचानकपणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणे, ही बाब वृद्धिंगत होत असलेल्या सहजीवनाच्या प्रक्रियेला तडा देणारी ठरत आहे.
अॅट्रॉसिटीचे जेवढे गुन्हे दाखल होतात, त्यातील बहुतांश गुन्हे ‘तांत्रिक’ असतात, अशा तक्रारी आता वाढत आहे. यात काही प्रमाणत तथ्यही असले. राजकीय व वैयक्तिक हेवेदावे, भांडणे, राजकीय कुरघोड्या करण्यासाठी काही मंडळी या कायद्याचा गैरवापर करत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत.
जिल्ह्यात अॅट्रॉसिटीचे दाखल झालेले गुन्हे
अनुसूचित जाती - १७
अनुसूचित जमाती - ११
एकूण दाखल प्रकरणं- २८
कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हान
वर्षानुवर्षे चालत आलेल्या जातीव्यवस्था आजही कायम आहे. त्यातून अनुसूचित जाती-जमातीमधील नागरिकांवर होणारे अन्याय, अत्याचारही कायम आहेत. हेही वास्तव आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा अस्तित्वात आला, तरी त्यानंतरही अत्याचार थांबलेले नाहीत. ते रोखायचे आव्हान आजही कायम आहे. मात्र, या कायद्याच्या वाढत्या गैरवापरामुळे खऱ्या पीडितांवरही अन्यायच होत आहे. त्यातून सामाजिक सलोखाही धोक्यात येत आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर रोखण्याचे आव्हानही उभे ठाकले आहे. त्यासाठी सर्व समाजाच्या साथीने, प्रबोधनाच्या मार्गाने काही पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘तांत्रिक’ किती व ‘खरे’ किती?
मागील वर्षभरात २८ गुन्हे दाखल झाली आहेत. या गुन्ह्यांपैकी ‘तांत्रिक’ किती व ‘खरी’ किती, असा सवाल उपस्थित होत आहे. तांत्रिक गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी तर वाढलीच आहे मात्र, खऱ्या पीडितांना न्याय मिळण्यावर याचा थेट परिणाम होतो आहे. तांत्रिक गुन्ह्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे इतर समाजांमध्येही अस्वस्थता वाढत आहे. त्यातून पोलीस यंत्रणेवरही ताण व जबाबदारीही वाढल्याचे दिसून येत आहे.