तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांची पंचायत; वेळीच उघडला नाही चार जणांचा गणिताचा पेपर, उडाला गोंधळ
By महेश सायखेडे | Published: August 6, 2022 03:08 PM2022-08-06T15:08:47+5:302022-08-06T15:22:39+5:30
एमएएच- सीईटी परीक्षेतील प्रकार
वर्धा : जिल्ह्यातील दोन केंद्रांवरून सध्या एमएएच- सीईटीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे. शुक्रवारी तनया कम्प्युटर लॅब तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी या दोन्ही केंद्रांवरून शांततेत परीक्षा पार पडली. असे असले तरी शनिवारी याच दोन केंद्रांवरील तब्बल चार विद्यार्थ्यांचा गणिताचा पेपरच वेळीच तांत्रिक बिघाडामुळे उघडला नसल्याने एकच तारांबळ उडाली होती.
सुमारे एक तासांच्या प्रयत्नाअंती पेपर उघडल्यानंतर या चारही परीक्षार्थ्यांना दीड तासांचा कालावधी देत पेपर सोडविण्याची संधी देण्यात आली. असे असले तरी या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थ्यांसह परीक्षा केंद्रांवरील अधिकाऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली होती.
दोन खासगी कंपन्या घेत आहेत परीक्षा
एमएएच-सीईटी ही परीक्षा जिल्ह्यातील दोन केंद्रांवरून घेतली जात असून ही परीक्षा दोन खासगी कंपन्यांच्या माध्यमातून घेतली जात आहे. दोन केंद्रांवरून शुक्रवारी ३०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिल्यानंतर शनिवारी तात्रिक अडचण निर्माण झाली होती.
पेपर एकूण २०० गुणांचा
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांना अनुसरून घेतल्या जाणाऱ्या एमएएच-सीईटी ही परीक्षा एकूण २०० गुणांची आहे. गणिताला १०० तर उर्वरित दोन विषयांना १०० गुण आहेत. पण शनिवारी तनया कम्प्युटर लॅब तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी या दोन केंद्रावरील तब्बल चार विद्यार्थ्यांचा गणित विषयाचा पेपर वेळीच उघडला नसल्याने एकच तारांबळ उडाली होती. तांत्रिक अडचणीमुळे पेपर उघडला नसल्याचे लक्षात येताच तातडीने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर एक तासानंतर पेपर उघला आणि विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला.
राजपत्रिक अधिकाऱ्यांनी सांभाळली केंद्र प्रमुखाची जबाबदार
वर्धा शहरातील तनया कम्प्युटर लॅब तसेच बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी या दोन केंद्रांवर केंद्र प्रमुख म्हणून राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड येताच या दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती देत योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर तांत्रिक दोष दूर करण्यात आला.