तहसीलदारांनी काढली समजूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:31 AM2019-03-23T00:31:12+5:302019-03-23T00:31:36+5:30
गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
झडशी : गावात मूलभूत सुविधांचा अभाव शिवाय बसस्थानकापर्यंतचा रस्ता दोन दशकापासून पूर्णत: उखडल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने बोरखेडी (गावंडे) येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. तहसीलदार महेंद्र सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर बहिष्कार मागे घेण्यात आला.
बोरखेडी (गावंडे) हे गाव महसुली दर्जा प्राप्त गाव आहे. झडशी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असून वॉर्ड क्र. ३ मध्ये समाविष्ट आहे. गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. याकडे वारंवार प्रशासनाने लक्ष वेधत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या तोंडावर बहिष्काराच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विविध प्रलोभने देऊन ग्रामस्थांनी मतदान करावे याकरिता करण्याचा प्रयत्न झाले. मात्र ग्रामस्थ ठाम असल्याने तहसीलदार महेंद्र सोनवणे, गटविकास अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी चव्हाण व बुंदिले यानी गावात भेट देत ग्रामस्थांची समजूत काढली.
तहसीलदारांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेतला. यावेळी माजी पोलिस पाटील ईश्वर ढोके, प्रमोद धनविज रितेश ढोके, प्रदीप शंभरकर, विवेक ढोके, माणिक शंभरकर, प्रफुल्ल ढोके, कमलाकर सूर्यवंशी, पूनम धनविज, शोभा ढोके, मंगल ढोके, सुधीर ढोके कानुपात्रा ढोके, धनराज ढोके, अरुण शंभरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याचा विषय पडला मागे
जिल्हा परिषद सदस्य विवेक हळदे यानी बोरखेडी येथील बसस्थानक ते गावापर्यंतच्या रस्त्याचा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत मांडला होता. विवेक हळदे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे या प्रस्तावावर सभागृहात परत चर्चाच झाली नाही. विषय मागे पडला.