कोरानायनात देऊळ बंद ; कोट्यवधीची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:25 PM2020-10-12T17:25:11+5:302020-10-12T17:27:10+5:30
Temple Wardha News Corona विदर्भासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांना कोरोनाकाळात कोट्यवधीचा फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ प्रकोपामुळे सहा महिन्यांपासून राज्यभरातील देऊळ बंद आहेत. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील चार प्रमुख देवस्थानांसह इतरही मंदिरांचा समावेश आहेत. विदर्भासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरांना कोरोनाकाळात कोट्यवधीचा फटका बसला आहे. तसेच मंदिरलगतच्या परिसरातील लहान व्यावसायिकांवर उपसमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने नियम व अटींच्या अधिन राहून मंदिर उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
पुरणपोळीच्या प्रसादाकरिता प्रसिद्ध असलेले आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान, टाकरखेडा येथील संत लहानुजी महाराज देवस्थान, केळझरचे सिद्धीविनायक देवस्थान तर गिरड येथील फरिदबाबा दर्गाह हे जिल्ह्यातील चार प्रसिद्ध देवस्थान आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानांमध्ये मोठी गर्दी असतात. गेल्या सहा महिन्यांपासून हे मंदिर बद असल्याने दानपेट्याही कोरड्या ठाक झाल्या आहे. तसेच देवस्थानची इतरही उलाठाल ठप्प झाली आहे. आजनसरा या देवस्थानला जवळपास ४० लाख, केळझरच्या देवस्थानाला आठ लाख, टाकरखेडच्या देवस्थानला २० लाख तर गिरडच्या दर्ग्याला जवळपास १० लाख असा एकूण ७८ लाखांचा फटका बसला आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतरही देवस्थांचा विचार केल्यास हे नुकसान कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतनही निम्मे करण्यात आले असून इतर खर्च करताना ओढाताण होत आहे. याशिवाय देवस्थान परिसरातील लहान व्यावसायिकांचे झालेले नुकसान यापेक्षा अधिक आहे.
आकस्मिक निधीवर पडला ताण
या देवस्थानांमध्ये भाविकांकरिता विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. समारंभाकरिता सभागृह बांधले असून वाहनतळाचीही वेगळे व्यवस्था आहेत. काही ठिकाणी गो-शाळेसह इतरही प्रकल्प राबविले जात आहे. सोबतच देवस्थानाची स्वच्छता व सुरक्षा ठेवण्याकरिता कर्मचारी नियुक्त केले आहेत. नियमित व्यवस्थापन केले जात आहे. आता सहा महिन्यांपासून भाविकांनी देवस्थानात पायच ठेवले नसल्याने उत्पादनाचा स्त्रोत बंद झाला आहे. त्यामुळे आता व्यवस्थापनाला देवस्थानाच्या आकस्मिक निधीतून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे देवस्थानांना दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहेत.
दीड हजारांवर कुटुंबांचा रोजगार हिरावला
देवस्थान म्हटले की त्या परिसरात इतरही लहान व्यावसायिकांचे बस्तान असतातच. या चारही देवस्थानांमध्ये दररोज भाविकांची वर्दळ राहत असल्याने या ठिकाणीही मंदिरपरिसरालगतच लहान व्यावसायिकांची अनेक दुकाने आहेत.पण, लॉकडाऊनपासून या चारही ठिकाणचे दीड हजारांवरील दुकाने बंद असल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. अनेकांनी आता शेतमजुरीचा मार्ग स्वीकारला असून कशीबशी उपजीविका चालवित आहे.