साई मंदिरातील दानपेटी फोडली
By admin | Published: October 8, 2014 11:30 PM2014-10-08T23:30:34+5:302014-10-08T23:30:34+5:30
दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या विठ्ठल टेकडी कारंजा येथील साईमंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ३ हजार रुपयांची रोकड आणि साईबाबाच्या डोक्यावरील
कांरजा (घाडगे) : दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या विठ्ठल टेकडी कारंजा येथील साईमंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यानी अंदाजे ३ हजार रुपयांची रोकड आणि साईबाबाच्या डोक्यावरील ४०० ग्रॅम वजनाचा १२ हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट लंपास केला. ही घटना मंगळवारी भर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे तालुक्यात भीतीचे वातवारण निर्माण झाले आहे.
या मंदिराचे २८ आॅगस्ट २०१४ रोजी बांधकाम झाले. यात साईबाबाच्या मूर्तीची स्थापना झाली होती. त्याच वेळेला साईबाबांच्या डोक्यावर चांदीचा मुकूट चढविण्यात आला आणि भक्तांकडून दान स्विकारता यावे म्हणून दानपेटी ठेवण्यात आली. यास मंदिरात नियमित पुजारी आहे. घटनेच्या दिवशी पुजारी बिहारीलाल पांडे जेवणासाठी कारंजा शहरात गेला होते. नेमकी हीच संधी साधून चोरांनी डाव साधल्याचे बोलले जात आहे. या मंदिरात असलेल्या सीसी टिव्ही कॅमेऱ्यामुळे चोराचे अस्पष्ट चित्र मिळाले; पण त्यावरून चोर किती आणि कोण याचा अंदाज पोलिसांना घेता आला नाही.
चोर तिघे होते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी एकाने परिसरात असलेल्या लहान मुलांना खेळण्यात गुंतविले व दोघांनी चोरी करून रोख रक्कम व चांदीचा मुकूट पळविला. या प्रकरणाची तक्रार कारंजा पोलिसात करण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या प्रकरणी ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मंगेश कांबळे चौकशी करीत आहे. चोरी गेलेली रक्कम जास्त असावी अशी चर्चा आहे. भर दिवसा मंदिरात झालेल्या या चोरीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)