जप्त केलेल्या दहा बोटी अजूनही नदीपात्रातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:35 PM2018-08-21T23:35:00+5:302018-08-21T23:36:05+5:30
वर्धा नदीच्या पात्रात बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी व देवळी तहसील कार्यालयाने संयुक्तरित्या कारवाई करीत दहा बोटी जप्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा नदीच्या पात्रात बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी व देवळी तहसील कार्यालयाने संयुक्तरित्या कारवाई करीत दहा बोटी जप्त केल्या. परंतु, जप्त करण्यात आलेल्या बोटी नदीपात्रातच ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वर्धा नदीपात्रात यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीतील रेतीघाटामध्ये बोटींच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्या बोटी वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्याच्या हद्दीत हलविल्या. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकाºयांनी देवळी तहसील कार्यालयाला सूचना केली. लागलीच मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी वर्धा नदीपात्रातील वाघोली आणि आपटी घाटावर जाऊन दहा बोटी जप्त केल्या. यात वाघोली घाटात सात तर आपटी घाटात तीन बोटी आढळून आल्या. याप्रकरणी यवतमाळच्या उपविभागीय अधिकाºयांनी त्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जप्तीतील दहाही बोटी अजुनही आपटी आणि वाघोली घाटात कायम असून त्या बोटी घाटधारकांसाठी तर ठेवल्या नाही ना, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
बोटी पळवून नेण्याची शक्यता
देवळी तालुक्याच्या हद्दीतील आपटी आणि वाघोली घाटात तहसीलदार भागवत यांनी कारवाई केली होती. त्यावेळी एक बोट हातात लागली तर डोळ्यादेखात नऊ बोटी रेती माफियांनी पळून नेल्या होत्या. जप्त केलेली ती बोट नष्ट करण्यात आली होती. त्या बोटीही यवतमाळ जिल्ह्यातील घाटधारकांच्या असून वर्धा जिल्ह्यात धुडगूस घालत होत्या. आताही यवतमाळ जिल्ह्यातील दहा बोटी वर्धा जिल्ह्यातच जप्त करण्यात आल्या आहे; पण त्या ताब्यात घेतल्या नसल्याने रेती माफिया त्या पळवून नेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या कारवाई आपटी घाटात तीन आणि वाघोली घाटात सात बोटी जप्त केल्या आहे. त्या बोटी जवळपास दीडशे ते दोनशे फुट खोलात असल्याने आपल्या हद्दीतून त्यांना ताब्यात घेण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत आज जिल्हाधिकाºयांना अहवाल पाठविण्यात आला. त्यावर मिळालेल्या मार्गदर्शनानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- प्रदीप वर्पे, प्रभारी तहसीलदार, देवळी.