साईनगरात आढळले डेंग्यूचे दहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:00 AM2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:25+5:30

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना न.प. चा आरोग्य विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी या परिसरात तातडीने धूरळणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Ten dengue patients found in Sainagar | साईनगरात आढळले डेंग्यूचे दहा रुग्ण

साईनगरात आढळले डेंग्यूचे दहा रुग्ण

Next
ठळक मुद्देनागरिकांंमध्ये दशहत : उपायेयाजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील साईनगर परिसरात महिनाभरापासून डेंग्यूने थैमान घातले आहे. एका घराआड येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. मात्र, उपाययोजना करण्याकडे नगरपालिका, जिल्हा आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शहरातील साईनगर वॉर्ड क्र. १९, प्रभाग ४ विस्ताराने मोठा असून मध्यवस्तीत आहे. एक महिन्यापासून साईनगरसह सहकारनगर, देवरणकर, ले-आउट, श्री गणेश व्यास मंदिर परिसरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. आतापावेतो याच भागातील पीयूष न्हाले, स्वप्नील किटे, मंजिरी देशमुख, ऋतुजा ठाकरे, स्वप्नील प्रसाद भडांगे यांच्यासह मुलगी, तसेच बोभाटे यांच्या दोन मुलांना डेंग्यूची लागण झाली आहे. यातील अनेक जण अद्याप उपचार घेत असल्याची माहिती याच भागातील नागरिकांनी दिली. एक घराआड दररोज डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यात चिमुकल्यांची संख्या अधिक आहे. यामुळे रहिवासी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना न.प. चा आरोग्य विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. डेंग्यूला आळा घालण्यासाठी या परिसरात तातडीने धूरळणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

न.प.चा आरोग्य व स्वच्छता विभाग सुस्त
कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य विभागावर निश्चित केली आहे. शिवाय डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी प्रभावी कार्य करण्याच्याही सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. परंतु, वर्धा शहरातील साईनगरात सध्या डेंग्यूने चांगलाच कहर केल्याने न.प.च्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.

खासगी डॉक्टरांची चांदी
मागीलवर्षी डेंग्यू या आजाराने वर्धा जिल्ह्यात चांगलेच थैमान घातले होते. त्यावेळी पॅथॉलॉजी आणि खासगी डॉक्टरांची चांगलीच चांदी झाली होती. तर सेवाग्राम रुग्णालयात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची गर्दीही वाढली होती.
डेंग्यूबाबतची गतवर्षीची पुनरावृत्ती यंदा होण्याची शक्यता बळावत असून सध्या काही पॅथॉलॉजी व खासगी डॉक्टरांची चांदी होत असल्याचे बोलले जात आहे.

रोहण्यात डेंग्यूने घेतला बळी
रोहणा - रोहणा येथील कैलास गोविंदराव अराडे (३५) यांचा डेंग्यू या आजाराने मृत्यू झाला. त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आठ दिवसांपूर्वी ताप आल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अशातच रक्त तपासणी केल्यावर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैलास अराडे यांच्या मृत्यूमुळे गावातील नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराबाबत कमालीची दहशत पसरली आहे. कैलासच्या मागे पत्नी आई, दोन बहिणी एक भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीच कैलासचे लग्न झाले होते.

Web Title: Ten dengue patients found in Sainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.